अलिबागमध्ये मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी मोफत वसतिगृह प्रवेश प्रक्रिया सुरू
रायगड, 09 जून (हिं.स.) : सामाजिक न्याय विभागांतर्गत मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी अलिबाग येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलांचे शासकीय वसतिगृहात शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी मोफत प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. इच्छुक व पात्र विद्यार्थ्य
Free-admission-process-begins-


रायगड, 09 जून (हिं.स.) : सामाजिक न्याय विभागांतर्गत मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी अलिबाग येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलांचे शासकीय वसतिगृहात शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी मोफत प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. इच्छुक व पात्र विद्यार्थ्यांनी मुदतीत अर्ज सादर करावेत, असे आवाहन वसतिगृहाचे गृहपाल जी. व्ही. विहाडे यांनी केले आहे.गणेश मंदिर शेजारी, विजयनगर, वरसोली (अलिबाग) येथे कार्यरत असलेल्या या वसतिगृहात इयत्ता 8 वी पासून पुढील शिक्षण घेणाऱ्या गरीब, होतकरू आणि गुणवंत विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो.

प्रवेश प्रक्रियेत अनुसूचित जातींसाठी 85 टक्के, अनुसूचित जमातींसाठी 3 टक्के, विमुक्त जाती व भटक्या जमातींसाठी 5 टक्के, आर्थिकदृष्ट्या मागास व इतर मागासवर्गीय दारिद्र्यरेषेखालील विद्यार्थ्यांसाठी 5 टक्के, तर विशेष मागास प्रवर्गासाठी 2 टक्के आरक्षण निश्चित करण्यात आले आहे.

वसतिगृहात विद्यार्थ्यांना मोफत निवास, सकस नाश्ता, दूध, फळे आणि पौष्टिक भोजनाची सुविधा उपलब्ध करून दिली जाते. तसेच आठवड्यातून दोन वेळा मांसाहारी जेवण, वह्या-पुस्तके, संगणक, ग्रंथालय, क्रीडा साहित्य आणि इतर शैक्षणिक सुविधा विनामूल्य दिल्या जातात. विद्यार्थ्यांना दरमहा 1,300 रुपये निर्वाहभत्ता तसेच गणवेश, रेनकोट आणि छत्री भत्ताही दिला जातो.

प्रवेशासाठी अनुसूचित जाती व जमातीच्या विद्यार्थ्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न 2.50 लाख रुपयांपर्यंत, तर विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्गीय व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी 1 लाख रुपयांपर्यंत असणे आवश्यक आहे.

शालेय विद्यार्थ्यांसाठी अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत 30 जून 2026 असून इयत्ता 11 वी, 12 वी तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांसाठी 15 जुलै 2026 पर्यंत अर्ज स्वीकारले जाणार आहेत.

अर्जासोबत उत्पन्नाचा दाखला, जात प्रमाणपत्र, गुणपत्रक, आधार कार्ड, बोनाफाइड प्रमाणपत्र आणि रेशनकार्डची प्रत जोडणे आवश्यक आहे. अर्ज वसतिगृहात उपलब्ध असून ऑनलाइन प्रक्रियाही सुरू आहे. अधिक माहितीसाठी गृहपाल जी. व्ही. विहाडे (मो. 9503116595) यांच्याशी कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

-----------------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande