जीएसटी अपील प्रकरणांच्या सुनावणीसाठी वरिष्ठ अधिकारी कोल्हापूरात येणार : नीरज कन्सल
कोल्हापूर, 09 जून (हिं.स.) : कोल्हापूर येथील नव्या सीजीएसटी कार्यालयात पुणे झोनचे मुख्य आयुक्त नीरज कन्सल यांच्या उपस्थितीत उद्योग व व्यापार क्षेत्रातील जीएसटी आणि कस्टम्स संबंधित समस्या, सूचना आणि अपेक्षांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी मुख्य
मुख्य आयुक्त नीरज कन्सल आणि कोल्हापूरचे उद्योजक


कोल्हापूर, 09 जून (हिं.स.) : कोल्हापूर येथील नव्या सीजीएसटी कार्यालयात पुणे झोनचे मुख्य आयुक्त नीरज कन्सल यांच्या उपस्थितीत उद्योग व व्यापार क्षेत्रातील जीएसटी आणि कस्टम्स संबंधित समस्या, सूचना आणि अपेक्षांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी मुख्य आयुक्त नीरज कन्सल यांनी महत्त्वपूर्ण घोषणा करत सांगितले की, जीएसटी अपील प्रकरणांच्या सुनावणीसाठी पुण्यातील वरिष्ठ अधिकारी महिन्यातून एकदा कोल्हापूरला भेट देणार आहेत. तसेच भविष्यातील इन्कम टॅक्स प्रमाणे जीएसटी अपिलेट प्रणालीही फेसलेस करण्याबाबत सकारात्मक भूमिका असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यामुळे व्यापारी व उद्योजकांचा वेळ आणि खर्च वाचणार असल्याचे त्यांनी नमूद केले.

यावेळी कोल्हापूर फर्स्टचे चेअरमन सुरेन्द्र जैन यांच्या हस्ते मुख्य आयुक्तांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी कोल्हापूरच्या धार्मिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वैभवाचे दर्शन घडविणारी विशेष स्मृतिचिन्ह स्वरूपातील फोटो फ्रेम देण्यात आली. यावेळी विविध औद्योगिक व व्यापारी संघटनांच्या प्रतिनिधींनी जीएसटी रिफंड, ई-वे बिल, कॉम्प्लायन्स आणि तांत्रिक अडचणींबाबत मांडणी केली.कमी जोखीम श्रेणीतील करदात्यांचे रिफंड अधिक वेगाने मंजूर करण्याचे निर्देश देण्यात आले असून ९० टक्के तात्पुरता रिफंड त्वरित मंजूर करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. उच्च जोखीम श्रेणीतील चुकीने समाविष्ट झालेल्या करदात्यांच्या प्रकरणांनाही प्राधान्याने हाताळले जाणार आहे. तसेच कस्टम्स विभागात आधुनिक ‘कस्टम्स इंटिग्रेटेड सिस्टम’ (CIS) विकसित करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.

सुमित कुमार यादव, प्रसाद डी. गोरसे, सबरीश जी., रोहित जोशी आणि भूपेंद्रसिंह पॉल यांसह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. उद्योग, प्रशासन आणि संघटनांमधील समन्वयातून कोल्हापूरच्या विकासाला नवी दिशा मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. या बैठकीमुळे कोल्हापूरमधील व्यापारी आणि उद्योजकांना जीएसटी व कस्टम्स प्रक्रियेत अधिक सुलभता मिळेल तसेच प्रशासनाशी थेट संवाद वाढून तांत्रिक अडचणी कमी होण्यास मदत होईल. भविष्यातील सुधारणा आणि डिजिटल प्रणालीमुळे कर प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि कार्यक्षम होईल असेही उपस्थितांनी सांगितले. या निर्णयांचे सर्वांनी स्वागत केले आणि पुढील अंमलबजावणीवर भर देण्याची अपेक्षा व्यक्त केली असे ठरले.

----------------------

हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar


 rajesh pande