इंडियन डेअरी असोसिएशनच्या पश्चिम विभागाच्या उपाध्यक्षपदी डॉ. योगेश गोडबोले यांची निवड
कोल्हापूर, 09 जून (हिं.स.) : इंडियन डेअरी असोसिएशनच्या (आयडीए) पश्चिम विभागाच्या व्हा. चेअरमन (उपाध्यक्ष) पदी कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) चे कार्यकारी संचालक डॉ. योगेश गोपाळ गोडबोले यांची बिनविरोध निवड झाली आहे. आयडीएच्या पश्च
गोकुळचे कार्यकारी संचालक डॉ. योगेश गोडबोले


कोल्हापूर, 09 जून (हिं.स.) : इंडियन डेअरी असोसिएशनच्या (आयडीए) पश्चिम विभागाच्या व्हा. चेअरमन (उपाध्यक्ष) पदी कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) चे कार्यकारी संचालक डॉ. योगेश गोपाळ गोडबोले यांची बिनविरोध निवड झाली आहे.

आयडीएच्या पश्चिम विभागाच्या कार्यक्षेत्रात महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, गोवा तसेच दमण आणि दीव या राज्ये व केंद्रशासित प्रदेशांचा समावेश होतो. ही संस्था देशातील दुग्ध व्यवसाय, दुग्ध विज्ञान, संशोधन, तंत्रज्ञान, गुणवत्ता व्यवस्थापन आणि उद्योग विकासासाठी कार्य करणारी अग्रगण्य राष्ट्रीय संस्था म्हणून ओळखली जाते. दुग्ध क्षेत्रातील विविध घटकांमध्ये समन्वय साधणे आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रसार करणे ही संस्थेची प्रमुख उद्दिष्टे आहेत.

डॉ. गोडबोले हे सध्या सुमारे 4200 कोटी वार्षिक उलाढाल असलेल्या गोकुळ दूध संघाचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून 2021 पासून कार्यरत आहेत. गोकुळ हा देशातील आघाडीच्या सहकारी दुग्ध संस्थांपैकी एक मानला जातो. संस्थेच्या माध्यमातून दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी विविध उपक्रम प्रभावीपणे राबविले जात आहेत.

भारतीय दुग्ध उद्योगातील 31 वर्षांहून अधिक अनुभव असलेल्या डॉ. गोडबोले यांनी सहकारी, खाजगी आणि बहुराष्ट्रीय दुग्ध क्षेत्रात विविध जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. दूध संकलन, गुणवत्ता व्यवस्थापन, दुग्धप्रक्रिया, विक्री-विपणन, पशुपालक सेवा आणि प्रशासकीय व्यवस्थापन या क्षेत्रांतील त्यांचा व्यापक अनुभव विशेष मानला जातो. त्यांनी डेअरी टेक्नॉलॉजी, एमबीए, एम.फिल. (अर्थशास्त्र) तसेच पीएच.डी. या उच्च शैक्षणिक पात्रता प्राप्त केल्या आहेत.

निवडीनंतर प्रतिक्रिया देताना डॉ. गोडबोले यांनी इंडियन डेअरी असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांचे तसेच दुग्ध क्षेत्रातील सहकाऱ्यांचे आभार मानले. त्यांनी आपल्या यशाचे श्रेय गोकुळ दूध संघाच्या प्रगतीशील कार्यपद्धतीला, संचालक मंडळाला, प्रशासकीय यंत्रणेला आणि दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या विश्वासाला दिले.

पश्चिम विभागातील दुग्ध व्यवसाय अधिक तंत्रज्ञानाधारित, गुणवत्तापूर्ण आणि शाश्वत करण्यासाठी सर्व संबंधित घटकांशी समन्वय साधून काम करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.

-----------------------------

हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar


 rajesh pande