
पुणे, 09 जून, (हिं.स.)। हिंजवडी येथील माहिती-तंत्रज्ञान (आयटी) पार्क परिसरातील वाढत्या वाहतूक कोंडीवर मात करण्यासाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. हिंजवडी, माण, मारुंजी आणि वाकड या परिसरांना जोडणारे चार नवीन जोड रस्ते विकसित करण्याचे नियोजन करण्यात आले असून त्यासाठी भूसंपादनाचे प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करण्यात आले आहेत.भूसंपादन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर रस्त्यांच्या बांधकामास सुरुवात करण्यात येणार असल्याची माहिती पीएमआरडीएचे मुख्य अभियंता शिवप्रसाद बागडी यांनी दिली. या प्रकल्पांमुळे आयटी पार्क परिसरातील वाहतूक ताण कमी होऊन नागरिकांना दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.या योजनेअंतर्गत म्हाळुंगे ते हिंजवडी फेज-१ या मार्गाच्या रुंदीकरण आणि विकासकामाचाही समावेश आहे.
सध्या सात मीटर रुंदीचा असलेला हा रस्ता २४ मीटर रुंद करण्यात येणार असून सुमारे २.२ किलोमीटर लांबीपर्यंत त्याचा विकास केला जाणार आहे.तसेच सूर्या रुग्णालय, ठाकर वस्ती आणि माण गावठाण यांना जोडणारा आणखी एक २४ मीटर रुंदीचा नवीन जोड रस्ता प्रस्तावित करण्यात आला आहे. या रस्त्यांमुळे परिसरातील अंतर्गत वाहतूक अधिक सुलभ होण्यास मदत होणार आहे.हिंजवडी आयटी पार्कमध्ये दररोज मोठ्या प्रमाणात कर्मचारी आणि वाहनांची ये-जा होत असल्याने वाहतूक कोंडी ही गंभीर समस्या बनली आहे. या पार्श्वभूमीवर पीएमआरडीएच्या नव्या रस्ते प्रकल्पांकडे नागरिक आणि आयटी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु