
लातूर, 09 जून (हिं.स.)। लातूर जिल्ह्यातील देवणी तालुक्यातील बांबळी गावातील एका शेतकरी कुटुंबावर अत्यंत हृदयद्रावक प्रसंग ओढावला आहे. वीज कोसळून बैल दगावल्याने दुसरा बैल खरेदी करण्याची आर्थिक क्षमता नसल्यामुळे शेतकरी काशिनाथ गायकवाड यांना नांगराच्या दुसऱ्या बाजूला स्वतःच्या पत्नीला जुंपून शेतीची मशागत करावी लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
या घटनेची माहिती आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियावर पोस्टद्वारे शेअर केली. त्यांनी या घटनेला भारतीय शेतकऱ्यांच्या हलाखीच्या परिस्थितीचे विदारक वास्तव असल्याचे म्हटले आहे. रोहित पवार यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, देशाचे पोट भरण्यासाठी राबणाऱ्या अन्नदात्याच्या कुटुंबाला जनावराची जागा घ्यावी लागत असेल, तर ही बाब अत्यंत वेदनादायी आहे. स्थानिक प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि संबंधित मंत्र्यांनी या घटनेची तातडीने दखल घेऊन गायकवाड कुटुंबाला विशेष बाब म्हणून त्वरित मदत मिळवून द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.या घटनेमुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणी आणि ग्रामीण भागातील वास्तव पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis