छ.संभाजीनगर : कुणबी जात प्रमाणपत्रासाठी नागरिकांच्या मदतीसाठी हेल्पलाईन सुरू
छत्रपती संभाजीनगर, 09 जून (हिं.स.)। कुणबी, कुणबी मराठा व मराठा कुणबी जात प्रमाणपत्रांचे वितरण मा. न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीच्या दि. 24 ऑक्टोबर 2023 रोजीच्या स्थापनेपासून उपविभागीय स्तरावर सुरू आहे. तसेच शासन निर्णय दि. 02 सप्टेंबर 2025 नुसार है
छ.संभाजीनगर : कुणबी जात प्रमाणपत्रासाठी नागरिकांच्या मदतीसाठी हेल्पलाईन सुरू


छत्रपती संभाजीनगर, 09 जून (हिं.स.)। कुणबी, कुणबी मराठा व मराठा कुणबी जात प्रमाणपत्रांचे वितरण मा. न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीच्या दि. 24 ऑक्टोबर 2023 रोजीच्या स्थापनेपासून उपविभागीय स्तरावर सुरू आहे. तसेच शासन निर्णय दि. 02 सप्टेंबर 2025 नुसार हैदराबाद गॅझेटिअरच्या आधारे मराठा समाजातील पात्र व्यक्तींना कुणबी मराठा जातीचे प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी चौकशी करून सक्षम प्राधिकाऱ्यांना सहाय्य करण्याच्या उद्देशाने समित्यांची स्थापना करण्यात आलेली आहे.

शासन निर्णयानुसार मराठा समाजातील भूमिधारक तसेच भूमिहीन, शेतमजूर किंवा बटईने शेती करणाऱ्या व्यक्तीकडे शेतजमिनीच्या मालकीचा पुरावा उपलब्ध नसल्यास त्यांनी दि. 13 ऑक्टोबर 1967 पूर्वी स्वतः किंवा त्यांच्या पूर्वजांचे संबंधित स्थानिक क्षेत्रात वास्तव्य असल्याबाबत प्रतिज्ञापत्र सादर करणे आवश्यक आहे. या प्रतिज्ञापत्रासोबत सादर करण्यात आलेल्या अनुषंगिक पुराव्यांची सक्षम प्राधिकाऱ्यांकडून स्थानिक चौकशी करून खातरजमा करण्यात येते.

स्थानिक चौकशीदरम्यान संबंधित व्यक्तीच्या गावातील, कुळातील किंवा नातेसंबंधातील व्यक्तींना यापूर्वी कुणबी जातीचे प्रमाणपत्र प्राप्त झाले असल्यास आणि त्यांनी दावा करणारी व्यक्ती त्यांच्या नातेसंबंधातील किंवा कुळातील असून कुणबी असल्याचे प्रतिज्ञापत्र देण्यास तयारी दर्शविल्यास, अशा प्रतिज्ञापत्रांचा विचार करून गावपातळीवरील स्थानिक समिती व वंशावळ समितीच्या सहाय्याने आवश्यक चौकशी केली जाते. त्या चौकशीच्या आधारे सक्षम प्राधिकारी अर्जदारास कुणबी जातीचे प्रमाणपत्र देण्याबाबत अंतिम निर्णय घेतात.

या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालय, येथे नोंदी शोधणे, कुणबी जात प्रमाणपत्र, जात पडताळणी प्रमाणपत्र तसेच संबंधित बाबींमध्ये नागरिकांना सहाय्य करण्यासाठी हेल्पलाईन क्रमांक 8408067158 सुरू करण्यात आला आहे. या कामासाठी नायब तहसीलदार (सामान्य प्रशासन) लक्ष्मण तोटावाड व गजानन गाजरे, लिपिक-कम-डाटा एन्ट्री ऑपरेटर, जिल्हाधिकारी कार्यालय, हिंगोली या अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

---------------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande