होमगार्ड व पोलिसांचा मानवतेचा संदेश; रक्तदान शिबिरांना उत्स्फूर्त प्रतिसाद i
लातूर, 09 जून (हिं.स.) : रक्तदान हेच श्रेष्ठ दान या मानवतावादी संदेशाला प्रतिसाद देत लातूर जिल्ह्यात आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान उपक्रमांना नागरिक, होमगार्ड जवान, पोलीस अधिकारी-अंमलदार आणि सामाजिक संस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. होमगार्ड त
होमगार्ड प्रशिक्षण


लातूर, 09 जून (हिं.स.) : रक्तदान हेच श्रेष्ठ दान या मानवतावादी संदेशाला प्रतिसाद देत लातूर जिल्ह्यात आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान उपक्रमांना नागरिक, होमगार्ड जवान, पोलीस अधिकारी-अंमलदार आणि सामाजिक संस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. होमगार्ड त्रैमासिक संमेलनानिमित्त पोलीस मुख्यालय, बाभळगाव येथे आयोजित रक्तदान शिबिरात ८३ रक्तपिशव्यांचे संकलन करण्यात आले, तर औसा पोलीस ठाण्यातील शिबिरात १३४ रक्तपिशव्या जमा झाल्या. या दोन्ही उपक्रमांतून एकूण २१७ रक्तपिशव्यांचे संकलन होऊन मानवसेवेचा आदर्श निर्माण झाला आहे.

पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या संकल्पनेतून होमगार्ड लातूर जिल्हा शाखा, इंडियन रेडक्रॉस सोसायटी संचलित डॉ. भालचंद्र ब्लड सेंटर आणि रोटरी क्लब ऑफ लातूर मिडटाऊन यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी (दि. ९ जून) पोलीस मुख्यालय, बाभळगाव येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.रुग्णालयांमध्ये रक्ताचा पुरेसा साठा उपलब्ध राहावा, अपघातग्रस्त आणि गंभीर रुग्णांना वेळेत रक्त मिळावे तसेच रक्तदानाबाबत जनजागृती व्हावी, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश होता. शिबिरात मोठ्या संख्येने होमगार्ड जवान, पोलीस अधिकारी-कर्मचारी, सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी आणि नागरिक सहभागी झाले.

रक्तदानासोबत रस्ते सुरक्षेचा संदेश

या शिबिराचे विशेष आकर्षण म्हणजे रोटरी क्लब ऑफ लातूर मिडटाऊनचा वन हेल्मेट, वन लाईफ उपक्रम. या अंतर्गत रक्तदात्यांना मोफत हेल्मेटचे वाटप करण्यात आले. रक्तदानासोबतच सुरक्षित वाहनचालना आणि वाहतूक नियमांचे महत्त्व अधोरेखित करण्याचा हा अभिनव प्रयत्न उपस्थितांच्या विशेष पसंतीस उतरला.हेल्मेटचा वापर म्हणजे सुरक्षित प्रवास हा संदेश देत रस्ते अपघातांमध्ये होणारी जीवितहानी कमी करण्यासाठी जनजागृती करण्यात आली.दरम्यान, औसा पोलीस ठाण्यात आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरालाही नागरिक आणि पोलीस दलातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी मोठा प्रतिसाद दिला. या शिबिरात तब्बल १३४ रक्तपिशव्यांचे संकलन झाले. त्यामुळे लातूर जिल्ह्यात रक्तदानाची चळवळ अधिक व्यापक होत असल्याचे चित्र दिसून आले.

---------------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande