लातूरला पर्यावरणपूरक बनविण्यासाठी आयएमएचे अभियान
लातूर, 09 जून (हिं.स.) : लातूर शहर हरित, स्वच्छ आणि पर्यावरणपूरक बनविण्याचा संकल्प करत Indian Medical Association (आयएमए) लातूर शाखेने वर्षभर चालणाऱ्या स्वच्छता अभियानाला सुरुवात केली आहे. या उपक्रमाचा शुभारंभ मंगळवारी चंद्रनगर परिसरातील स्वच्छता म
आय एम ए


लातूर, 09 जून (हिं.स.) : लातूर शहर हरित, स्वच्छ आणि पर्यावरणपूरक बनविण्याचा संकल्प करत Indian Medical Association (आयएमए) लातूर शाखेने वर्षभर चालणाऱ्या स्वच्छता अभियानाला सुरुवात केली आहे. या उपक्रमाचा शुभारंभ मंगळवारी चंद्रनगर परिसरातील स्वच्छता मोहिमेद्वारे करण्यात आला.

चंद्रनगर येथील वर्धमान उद्यानात आयोजित स्वच्छता अभियानात डॉक्टर, महानगरपालिका कर्मचारी तसेच स्थानिक नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. यावेळी उद्यान परिसरातील पालापाचोळा, प्लास्टिक कचरा आणि इतर घनकचरा संकलित करण्यात आला. झाडांना आळे करून परिसर सुशोभीकरणाचे कामही करण्यात आले. स्वच्छता मोहिमेदरम्यान दोन ट्रॅक्टरभर कचरा गोळा करण्यात आल्याची माहिती देण्यात आली.

उद्यान आणि परिसरात मोठ्या प्रमाणात प्लास्टिक कॅरीबॅग्ज आढळून आल्याने डॉक्टरांनी नागरिकांना प्लास्टिकचा वापर टाळून कापडी पिशव्यांचा वापर करण्याचे आवाहन केले. त्यानंतर सहभागी सदस्यांनी परिसरातील रस्त्यांचीही स्वच्छता केली.

आयएमएचे अध्यक्ष डॉ. हर्षवर्धन राऊत आणि सचिव डॉ. विश्रांत भारती यांनी सांगितले की, हे स्वच्छता अभियान वर्षभर सातत्याने राबविण्यात येणार आहे. दर महिन्याच्या ९, १९ आणि २९ तारखेला शहरातील विविध भागांत श्रमदान आणि स्वच्छता उपक्रम आयोजित करण्यात येतील. त्यासाठी स्वतंत्र वेळापत्रक तयार करण्यात आले असून संबंधित भागातील नागरिकांना पूर्वसूचना देऊन त्यांचाही सहभाग वाढविण्यात येणार आहे.

शहर स्वच्छतेत लोकसहभाग वाढावा आणि हे अभियान लोकचळवळीचे स्वरूप धारण करावे, हा आयएमएचा प्रमुख उद्देश असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच या उपक्रमासाठी मानसी मीना, उपायुक्त वसुधा फड आणि महानगरपालिका प्रशासनाचे सहकार्य लाभत असल्याचेही त्यांनी सांगितले.

या स्वच्छता मोहिमेत डॉ. श्वेता पवार, डॉ. वर्षा दराडे, डॉ. आकांक्षा अवस्थी, डॉ. शुभांगी राऊत, डॉ. वेदांत अवस्थी, डॉ. गणेश पवार, डॉ. सुबोध सोमाणी, डॉ. शैला सोमाणी, डॉ. आनंद कलमे यांच्यासह अनेक डॉक्टर, सामाजिक कार्यकर्ते, स्थानिक नागरिक आणि महानगरपालिकेचे सफाई कर्मचारी सहभागी झाले होते

------------------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande