
पुणे, 09 जून, (हिं.स.)। यंदाच्या मॉन्सून हंगामात ‘एल निनो’च्या प्रभावामुळे राज्यात अपुरा व अनियमित पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांचे नुकसान कमी करण्यासाठी राज्य कृषी विभागाने कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित ‘आय-सॅट’ मार्गदर्शक प्रणालीचा अवलंब करण्याचा निर्णय घेतला आहे.या उपक्रमांतर्गत राज्यातील नऊ कृषी हवामान विभागांतील सुमारे ४० लाख शेतकऱ्यांना संपूर्ण मॉन्सून हंगामात पावसाच्या संभाव्य स्थितीनुसार पीक निवड, लागवड, खत व्यवस्थापन आणि इतर शेतीविषयक निर्णयांसाठी वेळोवेळी मार्गदर्शन केले जाणार आहे.
केंद्र सरकारच्या ‘मॉन्सून मौसम’ प्रकल्पाअंतर्गत हैदराबाद येथील आंतरराष्ट्रीय कोरडवाहू उष्णकटिबंधीय पिक संशोधन संस्थेच्या पुढाकाराने महाराष्ट्रातील ‘एल निनो’च्या संभाव्य परिणामांचा अभ्यास करण्यात आला आहे. या अहवालाच्या आधारे शेतकऱ्यांना कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीने योग्य पीक नियोजन आणि जोखीम कमी करण्यासाठी आवश्यक सूचना दिल्या जाणार आहेत.
अहवालानुसार ‘एल निनो’च्या काळात कापूस, मका आणि सोयाबीन ही पिके सर्वाधिक संवेदनशील मानली जातात. तांदूळ आणि कडधान्ये मध्यम प्रमाणात तग धरू शकतात, तर ज्वारी, बाजरी आणि नाचणी यांसारखी भरडधान्ये कमी पावसातही अधिक टिकाऊ ठरतात.पश्चिम महाराष्ट्रातील पर्जन्यछायेचा प्रदेश आणि मराठवाडा या भागांमध्ये अधिक पाणी लागणारी किंवा दीर्घ कालावधीची पिके घेणे जोखमीचे ठरू शकते. खरीप २०२६ हंगामासाठीच्या अंदाजानुसार मराठवाडा तसेच मध्य आणि पश्चिम महाराष्ट्रात सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता अधिक असून ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यांत त्याचा सर्वाधिक परिणाम जाणवू शकतो.या परिस्थितीत शेतकऱ्यांनी हवामानाचा अंदाज, कृषी विभागाच्या सूचना आणि कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित मार्गदर्शनाचा उपयोग करून पीक नियोजन करावे, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. यामुळे संभाव्य दुष्काळी परिस्थितीतही उत्पादन टिकवून ठेवण्यास आणि आर्थिक नुकसान कमी करण्यास मदत होणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु