
रायगड, 09 जून (हिं.स.)। महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या कोकण विभागीय मंडळामार्फत जून-जुलै २०२६ मध्ये होणाऱ्या इयत्ता दहावी व बारावीच्या पुरवणी परीक्षांच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थी आणि पालकांसाठी विशेष हेल्पलाईन तसेच समुपदेशन सेवा सुरू करण्यात आली आहे. परीक्षा कालावधीत विद्यार्थ्यांच्या मनातील ताणतणाव, भीती, शंका आणि विविध अडचणी दूर करण्यासाठी ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असल्याची माहिती विभागीय सचिव पुनिता गुरव यांनी दिली.
बारावीची पुरवणी परीक्षा १६ जून ते ८ जुलै २०२६ या कालावधीत तर दहावीची पुरवणी परीक्षा १६ जून ते ३० जून २०२६ या कालावधीत घेण्यात येणार आहे.विद्यार्थ्यांना परीक्षेचा ताण येऊ नये आणि मानसिक आधार मिळावा यासाठी ८ जूनपासून परीक्षा संपेपर्यंत समुपदेशन सेवा सुरू करण्यात आली आहे. यासाठी समुपदेशक संदिप दत्ताराम शिर्के (९५५२०६४६४०) आणि भाग्यविधाता भास्कर वारंग (९४२३२१३२४०) यांच्याशी विद्यार्थी व पालक संपर्क साधू शकतात.
तसेच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आणि तांत्रिक शंकांचे निरसन करण्यासाठी मंडळाने विविध अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. विभागीय सचिव पुनिता गुरव (९०११२६२८४०), विभागीय सहाय्यक सचिव प्रेरणा शिंदे (९६७३०८००७७), इयत्ता १२ वीचे पर्यवेक्षक लिपिक अनिल पवार (९६७३१२१२६७), इयत्ता १० वीचे पर्यवेक्षक लिपिक राजेंद्र यादगिरे (९४२०५१८२१३) तसेच लेखा व भांडार शाखेचे गजानन जाधव (८०८७७४६१२२) यांच्याशी संपर्क साधता येणार आहे.
याशिवाय विद्यार्थी आणि पालकांसाठी ०२३५२-२३१२५० हा विशेष हेल्पलाईन क्रमांक उपलब्ध करून देण्यात आला असून सकाळी ८ ते सायंकाळी ८ या वेळेत या क्रमांकावर संपर्क साधून मार्गदर्शन घेता येणार आहे. पुरवणी परीक्षेला बसणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन कोकण विभागीय मंडळाने केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)