रिसॉर्ट पॉलिटिक्सने रंगली नांदेड विधान परिषद निवडणूक
नांदेड, 09 जून, (हिं.स.)। नांदेड विधान परिषद निवडणुकीची धामधूम अंतिम टप्प्यात पोहोचत असताना, लोकशाहीचा उत्सव आता सभागृहांपेक्षा रिसॉर्टच्या आलिशान दालनांमध्ये आणि पर्यटनस्थळांच्या सहलींमध्ये रंगू लागल्याचे चित्र दिसत आहे. विकास, विचारधारा आणि स्थान
रिसॉर्ट पॉलिटिक्सने रंगली नांदेड विधान परिषद निवडणूक


नांदेड, 09 जून, (हिं.स.)। नांदेड विधान परिषद निवडणुकीची धामधूम अंतिम टप्प्यात पोहोचत असताना, लोकशाहीचा उत्सव आता सभागृहांपेक्षा रिसॉर्टच्या आलिशान दालनांमध्ये आणि पर्यटनस्थळांच्या सहलींमध्ये रंगू लागल्याचे चित्र दिसत आहे. विकास, विचारधारा आणि स्थानिक प्रश्नांपेक्षा मतदारांना खूश ठेवण्याच्या नव्या राजकीय व्यवस्थापनाने सध्या जोर धरला असून, 'मतदार सुरक्षित तर विजय निश्चित' हा नवा फॉर्म्युला सर्वच राजकीय छावण्यांमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे.

क्रॉस व्होटिंगची भीती, राजकीय अनिश्चितता आणि शेवटच्या क्षणी होणाऱ्या समीकरणांच्या बदलामुळे विविध पक्षांनी आपल्या मतदारांना आकर्षित करण्यासाठी पर्यटन सहली, आलिशान निवास व्यवस्था आणि विविध मनोरंजनात्मक कार्यक्रमांचे नियोजन केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

पूर्वी निवडणूक म्हणजे प्रचारसभा, बैठका आणि राजकीय चर्चा असे चित्र होते. आता मात्र निवडणुकीचा नवा चेहरा समोर येत आहे. निसर्गरम्य वातावरण, वातानुकूलित खोल्या, बुफे जेवण आणि स्विमिंग पूलच्या सहवासात पक्षनिष्ठा अधिक दृढ होत असल्याचा राजकीय समज निर्माण झाला आहे. काही ठिकाणी मतदारांचे मोबाईलही मर्यादित संपर्कात ठेवले जात असल्याच्या चर्चा सुरू असून, निष्ठा टिकवण्यासाठी विशेष काळजी घेतली जात असल्याचे बोलले जात आहे.

राजकीय वर्तुळात तर याबाबत अनेक विनोदी चर्चानाही उधाण आले आहे. पूर्वी पक्षाच्या बैठकीत रमतदारांना काय सांगायचे? र यावर चर्चा व्हायची; आता आजचा मुक्काम कुठे आणि उद्याची सहल कोणत्या पर्यटनस्थळी ? हा प्रश्न अधिक महत्त्वाचा झाल्याची मिश्कील टिप्पणी केली जात आहे. सकाळी निसर्गभ्रमण, दुपारी मेजवानी, संध्याकाळी स्विमिंग पूल आणि रात्री राजकीय अंकगणित अशा नव्या प्रकारच्या 'लोकशाही प्रशिक्षण शिबिरांचा' अनुभव मतदार घेत आहेत.

दरम्यान, पक्षश्रेष्ठी मात्र एकही मत हातातून जाऊ नये यासाठी सावध झाले आहेत. नजर हटी, दुर्घटना घटी या सूत्रानुसार प्रत्येक हालचालीवर बारीक लक्ष ठेवले जात असल्याची चर्चा असून, मतदारांच्या सुरक्षिततेपासून ते त्यांच्या निवासापर्यंत सर्व व्यवस्थेवर विशेष भर दिला जात आहे.

यंदाच्या विधान परिषद निवडणुकीने मात्र एक वेगळीच राजकीय संस्कृती समोर आणली आहे. विकासाच्या मुद्यांपेक्षा मतदार व्यवस्थापन, निष्ठेचे संरक्षण आणि पर्यटन सहलींचे नियोजन हेच यशाचे नवे परिमाण ठरताना दिसत आहे. त्यामुळे ही निवडणूक केवळ मतांची राहिलेली नसून, र - रिसॉर्ट व्यवस्थापनर आणि राजकीय पर्यटनर यांच्यातील स्पर्धा बनल्याची उपरोधिक चर्चा रंगू लागली आहे. मतदानाचा दिवस जवळ येत असताना, या सहलींमधून परतलेली निष्ठा मतपेटीत कोणाला राजकीय संजीवनी देते, आणि कोणाचे राजकीय गणित बिघडवते, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

--------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande