
कोल्हापूर, 9 जून, (हिं.स.)। रक्ताचे पाट वाहीले आणि आमचा जीव गेला तरी आम्ही आमची जमीन देणार नाही असा निर्धार व्यक्त करीत गरज नसलेला शक्तिपीठ महामार्ग रद्द करावा या मागणीसाठी कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर कोल्हापूर जिल्हयातील हजारो शेतकऱ्यांनी विराट मोर्चा काढला.
काँग्रेसचे खा. शाहू छत्रपती, काँग्रेस जिल्हाध्यक्ष, आ. सतेज पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खा. राजू शेट्टी, माजी आमदार ऋतुराज पाटील आणि माजी आमदार सत्यजित पाटील सरुडकर, विजय देवणे यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला.
दसरा चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे निघालेल्या शेतकऱ्यांच्या विराट मोर्चात हजारो शेतकरी सहभागी झाले. कोल्हापूर जिल्ह्यातील ७८ गावांमधून प्रस्तावित असलेल्या या महामार्गाला तीव्र विरोध दर्शवत महिला शेतकऱ्यांचीही मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. दसरा चौक, व्हिनस चौक, असेम्बली रोडवरून निघालेल्या मोर्चात स्त्रि पुरुष शेतकऱ्यांच्या हातात शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधातील फलक होते. शेतकऱ्यांनी महामार्गाविरोधात घोषणांनी परिसर दणाणून सोडला. जमीन आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची, रक्त सांडू पण महामार्ग होऊ देणार नाही अशा घोषणा देत शेतकऱ्यांनी संतप्त भावना व्यक्त केल्या. अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या जमीनी गेल्या तर शेतकरी मोठया प्रमाणात भुमीहीन होणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व धार्मिक स्थळाना जाण्यासाठी समांतर आणि चांगले रस्ते आहेत त्यामुळे वेगळ्या शक्तीपीठ महामार्गाची गरज नाही.
मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आल्यानंतर मोर्चाचे रुपांतर झाले. विविध नेत्यांनी यावेळी शेतकऱ्यांच्या भावना मांडत सरकारने शक्तिपीठ महामार्गाचा प्रस्ताव तातडीने मागे घ्यावा, अशी मागणी केली.
आ. सतेज पाटील यांनी हा मोर्चा निघु नये म्हणून सरकारने दडपशाही केली तरीही हा विराट मोर्चा निघाला असून शेतकरी मोर्चात असताना मोजणी चालू केली. हिम्मत असेल तर शेतकरी जागेवर असताना मोजणी करून दाखवा असे अव्हान दिले आणि 12 जिल्हयातील शेतकरी आंदोलनाची पुढील दिशा ठरवणार असल्याचे सांगितले.
राष्ट्रवादी (श.प.) गटाचे नेते आ. जयंतराव पाटील यांनी या आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी आलो असून कोल्हापूर सांगली सातारा जिल्हयातील सर्व शेतकऱ्यांचा या महामार्गाला तिव्र विरोध आहे. या भावना फडणवीस शिंदे यांनी लक्षात घेऊन हा महामार्ग रद्द करावा असे सांगीतले.
राजू शेट्टी यांनी एक लाख कोटींच्या या महामर्गाचा खर्च सर्व सामान्यांच्या खिशातून वसूल होणार आहे. तो होऊ देणार नाही असा इशारा दिला. यावेळी माजी आ. संपतबापू पवार पाटील, सत्यजित पाटील, बाळासाहेब खाडे आदीनी आपल्या विरोधाच्या तीव्र भावना व्यक्त केल्या.
जमीनी गेल्या तर पुढच्या पीढीला जगणे मुश्कील होईल. मुलांची लग्ने होणार नाहीत. शेतकऱ्यांच्या जमिनी आणि उपजीविकेचा आणि जिवन मरणाया प्रश्न असल्यामुळे कोणत्याही परिस्थितीत हा महामार्ग होऊ देणार नसल्याचा निर्धार आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केला.
---------------
हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar