
लातूर, ९ जून (हिं.स.) ; कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या संच मान्यतेचे निकष कोणालाही विश्वासात न घेता गुप्तपणे बदलण्याच्या धोरणाचा तसेच शिक्षक संच मान्यतेत कपात करण्याच्या प्रस्तावाचा शिक्षक महासंघाने तीव्र निषेध केला आहे. या निर्णयामुळे शिक्षकांबरोबरच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हितालाही फटका बसणार असल्याने सध्या अस्तित्वात असलेले निकष कायम ठेवावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.
या मागणीसंदर्भातील निवेदन लातूर येथील शिक्षण उपसंचालक कार्यालयाचे सहाय्यक संचालक संजय पंचगल्ले यांना देण्यात आले. यावेळी प्राचार्य डॉ. संजय शिंदे, प्राचार्य संजय वाघमारे, प्राचार्य अजय पाटील, प्रा. बाळासाहेब बचाटे, प्राचार्य गोविंद शिंदे, प्राचार्य एकनाथ पाटील, प्राचार्य प्रशांत घार, प्राचार्य मारुती सूर्यवंशी, प्राचार्य जाधव, प्रा. गुणवंत बिराजदार आणि प्रा. राजेंद्र नागरगोजे यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
बैठकीत संच मान्यतेतील प्रस्तावित तरतुदींमुळे शिक्षकांच्या संख्येवर होणारा विपरीत परिणाम तसेच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर होणारे संभाव्य दुष्परिणाम याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. त्यानंतर संबंधित मागण्यांचे निवेदन सहाय्यक संचालकांकडे सादर करण्यात आले.
महासंघाने निवेदनाद्वारे स्पष्ट केले की, प्रात्यक्षिक (प्रॅक्टिकल) बॅचमधील विद्यार्थ्यांची संख्या २० वरून ३० करण्याचा प्रस्ताव कोणत्याही परिस्थितीत स्वीकारला जाणार नाही. प्रॅक्टिकल बॅचची विद्यार्थ्यांची संख्या पूर्वीप्रमाणे २०च ठेवण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.
तसेच राज्यातील विविध विभागांमध्ये प्रचलित असलेल्या ४० आणि ४५ मिनिटांच्या तासिका पूर्ववत कायम ठेवाव्यात, अशीही जोरदार मागणी करण्यात आली. या मागण्यांना पाठिंबा देताना विविध शासन निर्णय आणि परिपत्रकांचा आधार संघटनेने दिला.
----------------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis