सोलापूर : मोहिते-पाटलांच्या एंट्रीमुळे विधानपरिषद निवडणुकीत रंगत
सोलापूर, 09 जून (हिं.स.) गेल्या दशकभरापासून जिल्ह्याच्या सक्रिय राजकारणापासून काहीसे दूर राहिलेले मोहिते-पाटील कुटुंब विधानपरिषद निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा केंद्रस्थानी आले आहे. लोकसभा, विधानसभा आणि विधानपरिषद निवडणुकांमध्ये प्रस्थापितांना
Patil Mohite


सोलापूर, 09 जून (हिं.स.) गेल्या दशकभरापासून जिल्ह्याच्या सक्रिय राजकारणापासून काहीसे दूर राहिलेले मोहिते-पाटील कुटुंब विधानपरिषद निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा केंद्रस्थानी आले आहे. लोकसभा, विधानसभा आणि विधानपरिषद निवडणुकांमध्ये प्रस्थापितांना धक्का देण्याचा इतिहास असलेल्या मोहिते-पाटील यांनी यंदाच्या निवडणुकीतही राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

महायुतीचे उमेदवार राजेंद्र राऊत यांच्या विरोधात वसंतराव देशमुख निवडणुकीच्या रिंगणात असले तरी या लढतीची सूत्रे मोहिते-पाटील यांनी स्वतः हाती घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात असताना विरोधी उमेदवारी कायम राहिल्याने ते समीकरण धुळीस मिळाल्याचे मानले जात आहे.निवडणुकीची रणनीती पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी आखल्याचे सांगितले जात असले, तरी शेवटच्या टप्प्यात मोहिते-पाटील यांनी केलेल्या राजकीय हालचालींमुळे निवडणुकीत चुरस निर्माण झाली आहे. त्यामुळे आता या आव्हानाला पालकमंत्री गोरे आणि महायुती कशा पद्धतीने सामोरे जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे

'अशक्य ते शक्य' करून दाखविण्याची प्रतिमा असलेल्या मोहिते-पाटील कुटुंबाने यापूर्वी अनेक निवडणुकांत अनपेक्षित निकाल घडवून आणले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर धैर्यशील मोहिते-पाटील यांनी ६०० अदृश्य हात आमच्या पाठीशी आहेत असा दावा केल्याने राजकीय चर्चांना अधिक उधाण आले आहे.महायुतीकडे ६०० हून अधिक मतांचे संख्याबळ असल्याचे मानले जात असले तरी प्रत्यक्ष मतदानावेळी काय घडते, याबाबत उत्सुकता वाढली आहे. यापूर्वी दोन लोकसभा, तीन विधानसभा आणि दोन विधानपरिषद निवडणुकांमध्ये विजयाचे समीकरण निश्चित मानले जात असतानाही अनपेक्षित निकाल लागल्याचा इतिहास आहे.महानगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांमधील यशामुळे राजकीय रणनीतीकार म्हणून ओळख निर्माण केलेले पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यासमोरही ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे. त्यामुळे मोहिते-पाटील यांनी टाकलेल्या या राजकीय डावाला उत्तर देण्यात महायुती कितपत यशस्वी ठरते, यावर आगामी राजकीय घडामोडींचे चित्र अवलंबून राहणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande