
छत्रपती संभाजीनगर, ९ जून (हिं.स.) : छत्रपती संभाजीनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत उमेदवारी अर्जांच्या छाननीदरम्यान तब्बल १९ अर्जांवर आक्षेप नोंदविण्यात आल्याने निवडणूक प्रक्रियेला राजकीय रंग चढला आहे. विशेष म्हणजे पालकमंत्री संजय शिरसाट आणि भाजप नेते राजू शिंदे यांच्यातील राजकीय संघर्ष या निवडणुकीतही स्पष्टपणे दिसून आला.
छाननी प्रक्रियेदरम्यान शिरसाट आणि शिंदे यांनी एकमेकांच्या उमेदवारी अर्जांवर आक्षेप घेतल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राजकीय चुरस वाढल्याचे चित्र आहे.
याशिवाय, खासदार डॉ. कल्याण काळे यांच्या उमेदवारी अर्जावरही आक्षेप नोंदविण्यात आला आहे. त्यामुळे प्रमुख राजकीय नेत्यांच्या अर्जांबाबत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचा निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे.
दरम्यान, अनुसूचित जाती-जमाती मतदारसंघातील उमेदवारी अर्जांवर सर्वाधिक सहा आक्षेप दाखल झाल्याची नोंद आहे. विविध कारणांवरून दाखल झालेल्या या आक्षेपांमुळे छाननी प्रक्रिया चर्चेचा विषय ठरली आहे.
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक ही जिल्ह्यातील राजकीय आणि सहकार क्षेत्रातील प्रतिष्ठेची मानली जाते. त्यामुळे उमेदवारी अर्जांवरील आक्षेप आणि प्रमुख नेत्यांमधील आरोप-प्रत्यारोप यामुळे निवडणुकीचे वातावरण अधिकच तापले असून आगामी घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागले आहे.
------------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis