
सोलापूर, 09 जून (हिं.स.)। राज्य परिवहन महामंडळाकडून महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना देण्यात येणाऱ्या एनसीएमसी या ५० टक्के सवलतीच्या स्मार्ट कार्ड शिबिराचा लाभ २५२ जणांनी घेतला. प्रभाग क्रमांक ८ मधील भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या कार्यकर्त्या स्नेहा वनकुद्रे यांच्यातर्फे हे शिबिर घेण्यात आले. सोलापूर महानगरपालिका शाळा क्रमांक तीन मध्ये घेण्यात आलेल्या या शिबिराचे उद्घाटन भारतीय जनता पार्टीचे शहर उपाध्यक्ष मोहन डांगरे यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी नगरसेवक अमर पुदाले, नगरसेविका गीता गवई, संयोजिका स्नेहा वनकुद्रे यांची प्रमुख उपस्थिती होती.
वय वर्षे ११ ते ६५ वर्षांपर्यंतच्या मुली व महिलांना तसेच ६५ वर्षांवरील जेष्ठ नागरिक महिला व पुरुषांना महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडून एसटी प्रवासाच्या तिकिटामध्ये ५० टक्के सवलत देण्यात येते. याकरिता शासनाकडून एनसीएमसी कार्ड मिळते. हे कार्ड ज्येष्ठ नागरिकांना तसेच महिला, मुलींना त्यांच्या घराजवळच उपलब्ध व्हावे याकरिता या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात २५२ जणांनी अर्ज भरून या शिबिराचा लाभ घेतला. लवकरच या सर्व २५२ जणांना एनसीएमसी कार्ड देण्यात येणार आहे. या शिबिरामुळे महिला, मुली आणि जेष्ठ नागरिकांची सोय झाली. अत्यंत उपयुक्त कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल लाभार्थ्यांनी संयोजकांचे कौतुक केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड