
लातूर, 09 जून (हिं.स.) : लातूर जिल्ह्यातील देवणी तालुक्यातील बोंबळी गावात एका शेतकऱ्याच्या बैलजोडीवर वीज कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे. या घटनेत शेतकरी काशिनाथ गायकवाड यांच्या एका बैलाचा मृत्यू झाला असून दुसरा बैलही कामासाठी वापरण्यायोग्य राहिला नाही.
घटनेनंतर काशिनाथ गायकवाड यांच्यावर उपजीविकेचे संकट ओढवले. शेतीच्या कामासाठी पर्यायी साधन नसल्याने त्यांनी अत्यंत कठोर परिस्थितीत आपल्या वृद्ध पत्नीला औताला जुंपण्याचा निर्णय घेतल्याचे समोर आले आहे. भूमिहीन असलेले गायकवाड हे गावातील शेतकऱ्यांची जमीन कसून उदरनिर्वाह करतात.
या घटनेची माहिती गावकऱ्यांनी प्रशासन आणि माध्यमांना दिल्यानंतर तातडीने मदतकार्य सुरू करण्यात आले. जवळगा मंडळाचे जिल्हा परिषद सदस्य रामलिंग शेरे यांनी आमदार संभाजी पाटील निलंगेकर आणि युवा नेते अरविंद पाटील निलंगेकर यांच्या माध्यमातून तहसील कार्यालयाशी समन्वय साधत 32 हजार रुपयांची मदत शेतकरी कुटुंबापर्यंत पोहोचवली.
तसेच अक्का फाउंडेशन या सामाजिक संस्थेच्या वतीने 20 हजार रुपयांची रोख मदत देण्यात आली आहे. प्रशासन आणि स्थानिक पातळीवरील मदतीमुळे या कुटुंबाला काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.
या वेळी तहसीलदार श्री. सोमनाथ वाडकर, जिल्हा परिषद सदस्य रामलिंग शेरे, तलाठी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
--------------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis