
पुणे, 09 जून (हिं.स.) : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) गृहनिर्माण योजनेतील सदनिकांच्या सोडतीत पात्र ठरलेल्या मोठ्या संख्येतील लाभार्थ्यांनी पुढील प्रक्रिया करण्यास नकार दिल्याने शेकडो सदनिका पुन्हा उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे प्रतीक्षा यादीतील लाभार्थ्यांसाठी आता नवी संधी निर्माण झाली आहे.पीएमआरडीएच्या आकडेवारीनुसार, एकूण ८७१ सदनिकांसाठी झालेल्या सोडतीत ३९९ लाभार्थ्यांनी आपल्या सदनिका स्वीकारल्या आहेत. मात्र, तब्बल ३९९ लाभार्थ्यांनी सदनिका नाकारल्या असून ७३ लाभार्थ्यांनी कोणताही प्रतिसाद दिलेला नाही. अशा लाभार्थ्यांची नोंदणी प्रक्रिया रद्द करण्यात येणार आहे.यामुळे एकूण ४७२ सदनिका पुनर्वाटपासाठी उपलब्ध होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. परिणामी प्रतीक्षा यादीतील अर्जदारांना घर मिळण्याची संधी वाढली आहे. या प्रक्रियेसाठी लाभार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज व आवश्यक कार्यवाही करावी लागणार असून त्याबाबतच्या सविस्तर सूचना पीएमआरडीएकडून लवकरच जाहीर केल्या जाणार आहेत.गृहनिर्माण योजनेतील इतक्या मोठ्या संख्येने सदनिका नाकारल्या गेल्याने या निर्णयामागील कारणांबाबतही चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, प्रतीक्षा यादीतील अर्जदारांमध्ये नव्याने उत्साह निर्माण झाला असून पुढील प्रक्रियेची ते आतुरतेने वाट पाहत आहेत.पीएमआरडीए प्रशासनाकडून लवकरच पुनर्वाटपाची प्रक्रिया सुरू होणार असून पात्र लाभार्थ्यांना ऑनलाइन माध्यमातून आवश्यक सूचना आणि वेळापत्रक कळविण्यात येणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु