
नाशिक, 09 जून (हिं.स.) : राज्यसभेवर संधी न मिळाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्याबाबत नाराजी अधिक तीव्र होत असून त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांनी थेट “साहेब, निर्णय घ्या!” अशा आशयाचे पोस्टर लावल्याने नाशिक जिल्ह्यात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेपासून पक्षवाढीसाठी सक्रिय भूमिका बजावणाऱ्या छगन भुजबळ यांना पुन्हा एकदा डावलण्यात आल्याची भावना त्यांच्या समर्थकांमध्ये निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर येवला मतदारसंघात लावण्यात आलेल्या पोस्टरमुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
भुजबळ यांनीही यापूर्वी आपली नाराजी व्यक्त करत पक्षातील निर्णयांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. त्यानंतर समर्थकांनी त्यांच्या पुढील भूमिकेबाबत स्पष्टता मागत “साहेब निर्णय घ्या” अशी मागणी केली आहे.
दरम्यान, येवला मतदारसंघात राजेंद्र जैन यांना उमेदवारी देण्यात आल्यानेही स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये असंतोष वाढल्याचे दिसून येत आहे. भुजबळ यांच्या समर्थकांचे म्हणणे आहे की पक्षात त्यांना वेगळा न्याय दिला जात आहे, तर इतर नेत्यांना वेगळा.
राजकीय विश्लेषकांच्या मते, ओबीसी नेतृत्व म्हणून भुजबळ यांचा प्रभाव कायम असून त्यांच्या पुढील भूमिकेकडे राज्यातील राजकारणाचे लक्ष लागले आहे. भुजबळ राष्ट्रवादीत राहणार की नवीन निर्णय घेणार, याबाबत सध्या विविध चर्चांना उधाण आले आहे.
या संपूर्ण घडामोडींमुळे नाशिक जिल्ह्यातील राजकीय वातावरण आणखी चुरशीचे झाले असून पुढील काही दिवसांत यावर अधिक स्पष्टता येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
-----------------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV