पुणे-मुख्यमंत्र्यांच्या ड्रीम प्रोजेक्टला गती; पाताळलोक प्रकल्पाचे सर्वेक्षण युद्धपातळीवर
पुणे, 09 जून (हिं.स.)पुणे शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी महत्त्वाकांक्षी ठरणाऱ्या ५६ किलोमीटर लांबीच्या ‘पाताळलोक’ भुयारी मार्ग प्रकल्पाच्या सर्वेक्षणाला सुरुवात झाली असून, नोव्हेंबरपर्यंत सविस्तर प्रकल्प अहवाल पूर्ण करून डिसेंबरअखेर प्रत्यक्
पुणे-मुख्यमंत्र्यांच्या ड्रीम प्रोजेक्टला गती; पाताळलोक प्रकल्पाचे सर्वेक्षण युद्धपातळीवर


पुणे, 09 जून (हिं.स.)पुणे शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी महत्त्वाकांक्षी ठरणाऱ्या ५६ किलोमीटर लांबीच्या ‘पाताळलोक’ भुयारी मार्ग प्रकल्पाच्या सर्वेक्षणाला सुरुवात झाली असून, नोव्हेंबरपर्यंत सविस्तर प्रकल्प अहवाल पूर्ण करून डिसेंबरअखेर प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. ही माहिती महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी दिली.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली गत आठवड्यात पुण्यातील महत्त्वाच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांचा आढावा घेण्यात आला. या बैठकीत ‘पाताळलोक’ भुयारी मार्ग, अंतर्गत रिंग रोड आणि उच्च क्षमता द्रुतगती मार्ग (एचसीएमटीआर) या तीन महत्त्वाकांक्षी प्रकल्पांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.या तिन्ही प्रकल्पांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्य शासनाने स्वतंत्र कंपनी स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. या कंपनीचे अध्यक्ष महापालिका आयुक्त असतील, तर विविध विभागांचे अधिकारी सदस्य म्हणून कार्यरत राहतील.आयुक्त नवल किशोर राम यांच्या माहितीनुसार, ‘पाताळलोक’ प्रकल्पासाठी आवश्यक सर्वेक्षणाचे काम सुरू झाले आहे. प्रकल्पाला गती देण्यासाठी व्यवहार्यता अहवाल (फिजिबिलिटी रिपोर्ट) आणि सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) स्वतंत्र न करता एकत्रितपणे तयार करण्यात येणार आहेत.जून महिन्यापासून या अहवालाच्या तयारीचे काम सुरू झाले असून ते पूर्ण करण्यासाठी सुमारे पाच महिन्यांचा कालावधी अपेक्षित आहे. नोव्हेंबरपर्यंत अहवाल पूर्ण करून डिसेंबरअखेर प्रत्यक्ष बांधकामास सुरुवात करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.‘पाताळलोक’ प्रकल्पासह अंतर्गत रिंग रोड आणि एचसीएमटीआर हे प्रकल्प पूर्ण झाल्यास पुण्याच्या वाहतूक व्यवस्थेत मोठा बदल होणार असून शहरातील वाढती वाहतूक कोंडी कमी करण्यास मोठी मदत होणार आहे. त्यामुळे या प्रकल्पांकडे पुणेकरांचे विशेष लक्ष लागले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande