
सोलापूर, 09 जून (हिं.स.)ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर तीव्र शब्दांत टीका केली आहे. ओबीसी समाजाला डावलणाऱ्यांचे राजकीय अस्तित्व धोक्यात आले असून सरकारनेही ओबीसींच्या भावना दुर्लक्षित करू नयेत, असा इशारा त्यांनी दिला.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधताना हाके म्हणाले की, ज्यांनी तुमच्यावर कठोर टीका केली, त्यांच्यासोबत तुम्ही तडजोड करत आहात. मात्र ओबीसी समाजाच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असल्याची भावना निर्माण झाली आहे. ओबीसींना डावलले तर त्याचे राजकीय परिणाम भविष्यात दिसून येतील, असे त्यांनी म्हटले.आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलताना हाके यांनी सरकारच्या निर्णयांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ओबीसी समाजाच्या आरक्षणावर गदा येत असल्याचा आरोप करत त्यांनी सरकार मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर दबावाखाली निर्णय घेत असल्याचे म्हटले. ओबीसींचे हक्क अबाधित ठेवले पाहिजेत, अशी मागणी त्यांनी केली.
गेल्या विधानसभा निवडणुकीत ओबीसी समाजाने महायुतीला पाठिंबा दिला होता. मात्र सत्तेत आल्यानंतर सरकारने ओबीसी समाजाच्या अपेक्षांकडे दुर्लक्ष केल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली.दरम्यान, आमदार रोहित पवार यांनी १२ जूनपासून पंढरपुरात शेतकरी कर्जमाफीसाठी अन्नत्याग आंदोलन करण्याची घोषणा केली आहे. यावरही लक्ष्मण हाके यांनी टीका करत हे आंदोलन राजकीय हेतूने प्रेरित असल्याचा आरोप केला. शेतकरी प्रश्नांवर बोलण्याचा नैतिक अधिकार पवार कुटुंबाला नसल्याचा दावा करत त्यांनी रोहित पवार यांच्या आंदोलनावरही जोरदार निशाणा साधला.हाके यांच्या वक्तव्यामुळे ओबीसी आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आला असून त्यांच्या टीकेला सत्ताधारी आणि विरोधकांकडून काय प्रत्युत्तर दिले जाते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड