पुण्यातील बोगदे, रिंग रोड आणि एचसीएमटीआरला मिळणार वेग
पुणे, 09 जून (हिं.स.)। पुणे शहर आणि जिल्ह्यातील वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी नियोजित बोगदे, रिंग रोड आणि बहुप्रतीक्षित उच्च द्रुतगती वर्तुळाकार मार्ग (एचसीएमटीआर) या महत्त्वाच्या प्रकल्पांना गती देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व
Ring Road Pune


पुणे, 09 जून (हिं.स.)। पुणे शहर आणि जिल्ह्यातील वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी नियोजित बोगदे, रिंग रोड आणि बहुप्रतीक्षित उच्च द्रुतगती वर्तुळाकार मार्ग (एचसीएमटीआर) या महत्त्वाच्या प्रकल्पांना गती देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विशेष उद्देश वाहन (एसपीव्ही) स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत. या संदर्भातील प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे सादर केला जाणार आहे.या एसपीव्हीमध्ये पुणे महानगरपालिका, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आणि पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) यांच्या अधिकाऱ्यांचा समावेश असणार आहे. या यंत्रणेच्या माध्यमातून तिन्ही प्रकल्पांचे नियोजन, आराखडे, तांत्रिक प्रक्रिया आणि निविदा प्रक्रिया अधिक वेगाने पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

पुण्यातील वाढत्या वाहतूक समस्येवर कायमस्वरूपी उपाय म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शहरात बोगद्यांची संकल्पना मांडली होती. त्यासाठी एका खासगी सल्लागार कंपनीची नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचबरोबर पीएमआरडीएच्या हद्दीतील रिंग रोड आणि पुणे महापालिकेच्या विकास आराखड्यात १९८७ पासून प्रस्तावित असलेला एचसीएमटीआर प्रकल्पही प्राधान्याने पुढे नेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.एचसीएमटीआर मार्ग पूर्ण झाल्यास पुणे शहराला अखंड वर्तुळाकार द्रुतगती मार्ग उपलब्ध होणार असून शहरातील अंतर्गत वाहतुकीवरील ताण मोठ्या प्रमाणात कमी होण्याची अपेक्षा आहे. मात्र विविध कारणांमुळे हा प्रकल्प अनेक वर्षे रखडला होता.नुकत्याच झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोगदे, रिंग रोड आणि एचसीएमटीआर या तिन्ही प्रकल्पांना एकत्रित गती देण्यासाठी एसपीव्ही स्थापन करण्याचे निर्देश दिले. त्यामुळे पुण्याच्या भविष्यातील वाहतूक आराखड्याला नवी दिशा मिळणार असून शहराच्या पायाभूत विकासाला मोठी चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande