सोलापूर : अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांना सूक्ष्म सिंचन योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन
सोलापूर, 09 जून, (हिं.स.) : सन २०२६-२७ या वर्षासाठी राष्ट्रीय कृषि विकास योजनेअंतर्गत प्रति थेंब अधिक पीक (सूक्ष्म सिंचन) योजनेसाठी अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील लाभार्थी शेतकऱ्यांसाठी १.५५ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करण्यात आला अस
सोलापूर : अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांना सूक्ष्म सिंचन योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन


सोलापूर, 09 जून, (हिं.स.) : सन २०२६-२७ या वर्षासाठी राष्ट्रीय कृषि विकास योजनेअंतर्गत प्रति थेंब अधिक पीक (सूक्ष्म सिंचन) योजनेसाठी अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील लाभार्थी शेतकऱ्यांसाठी १.५५ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करण्यात आला असून पात्र शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करावेत, असे आवाहन करण्यात येत आहे. या योजनेंतर्गत प्रचलित आर्थिक मापदंडाच्या अथवा प्रत्यक्ष खर्चाच्या ९० टक्के मर्यादेत, यापैकी जे कमी असेल त्या प्रमाणात अनुदान देण्यात येणार आहे. लाभासाठी पात्र शेतकऱ्यांनी https://mahadbt.maharashtra.gov.in/Farmer/AgriLogin या महाडीबीटी पोर्टलवर नोंदणी करून अर्ज सादर करावेत.अर्ज भरण्यासाठी शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक आहे. अर्ज सादर करताना माहिती अचूक भरावी, अन्यथा अर्ज रद्द होण्याची शक्यता आहे.

अर्जासोबत ॲग्रीस्टॅक फार्मर आयडी, आधार कार्ड, बँक पासबुक व जातीचा दाखला सादर करणे आवश्यक आहे. या योजनेचा लाभ कमाल ५ हेक्टर क्षेत्रापर्यंत देण्यात येणार आहे.पोर्टलवर प्रथम अर्ज करणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्त्वानुसार अर्ज स्वीकारले जाणार असून अर्जांची संगणकीय सोडत काढण्यात येईल. निवड झाल्यानंतर लाभार्थी शेतकऱ्यांना लघुसंदेशाद्वारे माहिती देण्यात येणार आहे. सामूहिक सेवा केंद्राशी संपर्क साधने:-पूर्वसंमती मिळाल्यानंतर शेतकऱ्यांना नोंदणीकृत कंपनीच्या अधिकृत वितरकाकडून संच खरेदी करता येईल. संच बसविल्यानंतर उप कृषि अधिकारी यांच्यामार्फत प्रत्यक्ष स्थळ तपासणी करण्यात येईल. त्यानंतर लाभार्थी शेतकऱ्यांच्या आधार लिंक बँक खात्यावर अनुदानाची रक्कम जमा करण्यात येणार आहे.अधिक माहितीसाठी सहाय्यक कृषि अधिकारी, उप कृषि अधिकारी, मंडल कृषि अधिकारी, तालुका कृषि अधिकारी अथवा सामूहिक सेवा केंद्राशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले यांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande