
पुणे, 09 जून (हिं.स.)। जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या ३४१ व्या आषाढी पायी वारी पालखी सोहळ्यासाठी अत्याधुनिक आणि आकर्षक असा नवीन पालखी रथ तयार करण्यात येत असून त्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. पारंपरिकता आणि आधुनिकतेचा सुंदर संगम साधणारा हा रथ यंदाच्या वारीचे प्रमुख आकर्षण ठरणार आहे.यंदाच्या आषाढी वारीत संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा अत्याधुनिक सुविधांनी सज्ज अशा हायटेक रथातून पार पडणार आहे. हा रथ बर्मा टीक (सागवानी) लाकडापासून तयार करण्यात आला असून त्यावर दाक्षिणात्य शैलीतील आकर्षक कोरीव नक्षीकाम करण्यात आले आहे. तसेच रथावर सुमारे ३०० किलो चांदीचा मुलामा देण्यात येणार आहे.नवीन रथाच्या निर्मितीसाठी सुमारे दोन टन बर्मा टीक सागवानी लाकडाचा वापर करण्यात आला आहे. रथाचे एकूण वजन अंदाजे चार टन असले तरी तो जुन्या रथापेक्षा सुमारे ६०० किलोने हलका असणार आहे. त्यामुळे पालखी सोहळ्यादरम्यान बैलजोडींना रथ ओढणे अधिक सुलभ होणार असून वारीतील प्रवास अधिक सुरक्षित आणि संतुलित होण्यास मदत मिळणार आहे.रथाच्या निर्मितीत पारंपरिक सौंदर्य जपत आधुनिक तांत्रिक बाबींचाही विचार करण्यात आला आहे. मजबुती, टिकाऊपणा आणि सुरक्षितता यांना प्राधान्य देण्यात आल्याने हा रथ दीर्घकाळ वापरण्यायोग्य ठरणार आहे.आषाढी वारीसाठी लाखो वारकरी आणि भाविक उत्सुक असताना नवीन पालखी रथाचे काम अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. त्यामुळे यंदाच्या वारीत भक्तांना पारंपरिक वैभवासह आधुनिकतेची झलक अनुभवायला मिळणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु