
परभणी, 09 जून, (हिं.स.)। सेलू तालुक्यात रविवारी व सोमवारी झालेल्या जोरदार वादळी वार्यासह पावसामुळे मौजे सिद्धनाथ बोरगाव येथील शेतकरी जगन्नाथ दादाराव लिपणे यांच्या गट क्रमांक 113 मधील शेतातील विहिरीवर बसविण्यात आलेले सोलार पंपाचे पॅनल वादळी वार्यामुळे उडून गेले. त्यामुळे त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
या नैसर्गिक आपत्तीत सोलार पॅनलचे स्टॅन्ड वाकले असून काही पॅनल फुटल्याने सिंचन व्यवस्था पूर्णपणे ठप्प झाली आहे. परिणामी शेतातील पिकांना पाणी देण्यास अडचणी निर्माण झाल्या असून शेतकर्यांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे. शासनाच्या योजनेअंतर्गत बसविण्यात आलेले सोलार पंप शेतकर्यांसाठी दिलासादायक ठरत असताना नैसर्गिक आपत्तीमुळे त्यांचे नुकसान होत असल्याची खंत शेतकर्यांनी व्यक्त केली आहे. नुकसानग्रस्त शेतकरी जगन्नाथ लिपणे यांनी संबंधित कंपनीकडे भरपाईची मागणी केली असून अद्याप कोणतीही मदत मिळालेली नसल्याचे सांगितले.
दरम्यान, प्रशासनाने तातडीने पंचनामा करून नुकसानग्रस्त शेतकर्याला आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी परिसरातील शेतकरी व ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis