सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी भूसंपादनाचा मार्ग मोकळा
शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्यांवर मुख्यमंत्र्यांचे सकारात्मक आश्वासन नाशिक, 09 जून (हिं.स.) : आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर साधूग्राम आणि रिंग रोड प्रकल्पासाठी सुरू असलेल्या भूसंपादन प्रक्रियेला वेग मिळण्याची चिन्हे दिसत आहेत. शेतकऱ्यां
Soon-payment-for-the-


शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्यांवर मुख्यमंत्र्यांचे सकारात्मक आश्वासन

नाशिक, 09 जून (हिं.स.) : आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर साधूग्राम आणि रिंग रोड प्रकल्पासाठी सुरू असलेल्या भूसंपादन प्रक्रियेला वेग मिळण्याची चिन्हे दिसत आहेत. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक भूमिका घेतल्याने भूसंपादनावरील विरोध मावळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

राहुल ढिकले आणि सीमा हिरे यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची भेट घेत विविध प्रश्न मांडले. यामध्ये 2002 च्या कुंभमेळ्यादरम्यान साधूग्राम आणि रस्ते विकासासाठी विनामोबदला अधिग्रहित करण्यात आलेल्या जमिनींचा मोबदला देण्याची प्रमुख मागणी होती. याबाबत संबंधित शेतकऱ्यांना मोबदला देण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याचे सांगण्यात आले.

बैठकीत मखमलाबाद परिसरातील जिरायती म्हणून नोंद असलेल्या, परंतु प्रत्यक्षात बागायती स्वरूपाच्या जमिनींना बागायती दर्जा देऊन त्यानुसार नुकसानभरपाई देण्याची मागणीही करण्यात आली. मागील दहा वर्षांतील पीक नोंदी आणि जलउपलब्धतेचा विचार करून अशा जमिनींचे पुनर्मूल्यांकन करण्याबाबत सकारात्मक निर्देश देण्यात आल्याची माहिती देण्यात आली.

सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी प्रस्तावित 56 किलोमीटर लांबीच्या रिंग रोडमुळे अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी अधिग्रहित होणार आहेत. मोबदला, मूल्यांकन आणि इतर तांत्रिक बाबींवर शेतकऱ्यांनी आक्षेप घेतले होते. त्यानंतर आमदार राहुल ढिकले यांनी मखमलाबाद, आडगाव आणि नांदूर-मानूर परिसरात बैठका घेऊन शेतकऱ्यांच्या समस्या शासनापर्यंत पोहोचवल्या.

बैठकीत साधूग्राम परिसरातील रेडी रेकनर दरांमधील तफावत दूर करण्याची मागणीही करण्यात आली. काही भागांमध्ये अधिकृत मूल्यदर जास्त असताना प्रत्यक्ष अधिग्रहणासाठी अत्यल्प दर निश्चित करण्यात आल्याची बाब शिष्टमंडळाने निदर्शनास आणून दिली. यावर संबंधित जमिनींचे फेरमूल्यांकन करून शासकीय आणि बाजारभावानुसार योग्य मोबदला देण्याबाबत शासन स्तरावर विचार केला जाईल, असे आश्वासन देण्यात आले.

आडगाव परिसरातील शेतीजमिनींवरून जाणाऱ्या अतिउच्च दाबाच्या वीजवाहिन्या आणि टॉवर स्थलांतरित करण्याची मागणीही शेतकऱ्यांनी केली. यामुळे सुपीक शेती क्षेत्राचे नुकसान होण्याची भीती व्यक्त करण्यात आली. या मागणीवरही सकारात्मक भूमिका घेण्यात आल्याचे सांगण्यात आले.

तसेच पंचक गावाजवळ प्रस्तावित उड्डाणपुलावर स्थानिक नागरिक आणि व्यापाऱ्यांच्या सोयीसाठी रॅम्प उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली. परिसराच्या विकासासाठी आवश्यक त्या सुविधांचा विचार केला जाईल, असे आश्वासन बैठकीत देण्यात आले.

या सर्व मागण्यांवर सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याने शेतकऱ्यांनी सिंहस्थ कुंभमेळा निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी शासनाला सहकार्य करण्याची ग्वाही दिली. बैठकीला माजी स्थायी समिती सभापती उद्धव निमसे, नगरसेवक रिद्धेश निमसे, नामदेव शिंदे, सुरेश खेताडे यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.

----------------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande