
प्रशिक्षण, मतदान व मतमोजणीचे नियोजन पूर्ण
छत्रपती संभाजीनगर, 9 जून (हिं.स.) : आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदान प्रक्रियेचे सुरळीत व पारदर्शक आयोजन करण्यासाठी प्रशासनाने व्यापक तयारी केली असून क्षेत्रीय अधिकारी, मतदान अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना तीन टप्प्यांत प्रशिक्षण दिले जात आहे.
प्रशिक्षणाच्या दुसऱ्या टप्प्यात 12 जून रोजी धाराशिव येथील जिल्हा नियोजन समिती सभागृहात प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. तसेच 13 जून रोजी लातूर आणि बीड जिल्हाधिकारी कार्यालयांमध्ये संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. तिसऱ्या टप्प्यातील प्रशिक्षण 17 जून रोजी धाराशिव, लातूर आणि बीड या तीनही जिल्ह्यांत पार पडणार आहे.
निवडणूक प्रक्रियेवर प्रभावी देखरेख ठेवण्यासाठी बँक अधिकाऱ्यांची सूक्ष्म निरीक्षक (Micro Observer) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. धाराशिव जिल्ह्यातील आठ मतदान केंद्रांसाठी 11, लातूरमधील दहा मतदान केंद्रांसाठी 13 आणि बीडमधील अकरा मतदान केंद्रांसाठी 14 सूक्ष्म निरीक्षक नियुक्त करण्यात आले आहेत. अशा प्रकारे एकूण 29 मतदान केंद्रांवर 38 सूक्ष्म निरीक्षक कार्यरत राहणार आहेत.
आगामी 18 जून 2026 रोजी होणाऱ्या मतदानासाठी आवश्यक साहित्याचे वितरण 17 जून रोजी धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयातून करण्यात येणार आहे. मतदानानंतर साहित्याची स्वीकृती 18 जून रोजी धाराशिव येथील भाई उद्धवराव पाटील शासकीय औद्योगिक व प्रशिक्षण संस्थेत केली जाणार आहे.
दरम्यान, मतदानानंतरची मतमोजणी 22 जून रोजी धाराशिव येथील भाई उद्धवराव पाटील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत होणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.
निवडणूक प्रक्रिया शांततापूर्ण, पारदर्शक आणि नियोजनबद्ध पद्धतीने पार पाडण्यासाठी प्रशासनाकडून सर्व आवश्यक तयारी पूर्ण करण्यात आली असल्याचे सांगण्यात आले.
-----------------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis