
पुणे, 09 जून (हिं.स.)जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या आषाढी वारी पालखी सोहळ्याच्या पारंपरिक मुक्कामस्थळात अचानक बदल करण्यात आल्याने निमगाव केतकी परिसरातील ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. स्थानिक नागरिकांना विश्वासात न घेता शेकडो वर्षांची परंपरा मोडीत काढण्यात आल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी या निर्णयाविरोधात विशेष ग्रामसभेचे आयोजन केले.संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील प्रत्येक मुक्कामस्थळाला धार्मिक, सांस्कृतिक आणि भावनिक महत्त्व आहे. सराफवाडी रोडवरील महावितरण कार्यालयासमोरील प्रांगणात दरवर्षी पालखीचा मुक्काम होत असतो. मात्र, यंदा हा मुक्काम इरिगेशन वसाहतीमध्ये हलविण्याचा निर्णय घेण्यात आल्याने स्थानिक नागरिक आणि वारकरी यांच्यात असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे.वर्षानुवर्षे ज्या पवित्र स्थळी पालखीचा मुक्काम होत आला, त्या ठिकाणातील बदलामुळे गावाच्या ऐतिहासिक आणि धार्मिक परंपरेला धक्का बसल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली. पालखी सोहळा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असताना वारकऱ्यांच्या स्वागतासाठी, निवास आणि भोजन व्यवस्थेसाठी ग्रामस्थांनी केलेली तयारीही या निर्णयामुळे विस्कळीत झाल्याचा आरोप करण्यात आला.ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, नव्याने निश्चित करण्यात आलेल्या मुक्कामस्थळी आवश्यक मूलभूत सुविधांची कमतरता आहे. पार्किंगची अपुरी व्यवस्था, स्वच्छतागृहांचा अभाव, वीजपुरवठा आणि पिण्याच्या पाण्याच्या सुविधांची अपुरी उपलब्धता यामुळे वारकऱ्यांची गैरसोय होऊ शकते, अशी चिंता व्यक्त करण्यात आली.तसेच नवीन मार्गावरील पुलाचे काम अद्याप पूर्ण झाले नसल्याने वाहतूक व्यवस्थेवर परिणाम होण्याची शक्यता असून पालखी सोहळ्यादरम्यान अडचणी निर्माण होऊ शकतात, असेही ग्रामस्थांचे म्हणणे आहे. या निर्णयाचा फेरविचार करून पारंपरिक मुक्कामस्थळ कायम ठेवावे, अशी मागणी ग्रामस्थांनी प्रशासनाकडे केली आहे.दरम्यान, पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या या वादामुळे परिसरात चर्चेला उधाण आले असून प्रशासनाची भूमिका काय राहते याकडे वारकरी आणि नागरिकांचे लक्ष लागले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु