
सोलापूर, 09 जून (हिं.स.) - उजनी कालव्यातून माण नदीत पाणी सोडण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी केलेल्या आंदोलनाला अखेर यश आले असून खासदार प्रणिती शिंदे यांच्या पाठपुराव्यानंतर माण नदीत पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे पाणीटंचाईच्या संकटाचा सामना करणाऱ्या १६ गावांतील नागरिक, शेतकरी आणि पशुपालकांना मोठा दिलासा मिळाला आहे.माण नदीत सोडण्यात येणाऱ्या पाण्याचा लाभ गुंजेगाव, मारापूर, घरनिकी, मल्लेवाडी, शरदनगर, सिद्धेवाडी, ढवळस, धर्मगाव, नेपतगाव, तावशी, गार अकोले, सरकोली, तनाळी, तपकिरी शेटफळ, ओझेवाडी, मुढवी आणि शंकरगाव या गावांना होतो. पिण्याचे पाणी, शेती आणि जनावरांसाठी हा जलस्रोत अत्यंत महत्त्वाचा मानला जातो.यंदा पाणी सोडण्याचे रोटेशन चुकल्यामुळे या संपूर्ण परिसरात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली होती. त्यामुळे मान नदीकाठ संघर्ष समितीच्या वतीने उजनी प्रशासनाला नदीपात्रात तातडीने पाणी सोडण्याची मागणी करणारे निवेदन देण्यात आले होते. मात्र, त्यानंतरही प्रशासनाकडून कोणतीही कार्यवाही न झाल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी होती.अखेर संतप्त शेतकऱ्यांनी पंढरपूर-मंगळवेढा मार्गावर रस्ता रोको आंदोलन छेडले. या आंदोलनामुळे वाहतुकीत अडथळा निर्माण झाल्याने आंदोलनात सहभागी झालेल्या शेतकऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले. मागणीसाठी वारंवार निवेदने देऊनही प्रशासनाने दखल घेतली नाही, त्यामुळे आंदोलन करण्याची वेळ आल्याची भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली.दरम्यान, या भागातील शेतकऱ्यांनी खासदार प्रणिती शिंदे यांची भेट घेऊन आपल्या अडचणी मांडल्या. त्यानंतर त्यांनी संबंधित प्रशासनाशी पाठपुरावा केल्याने अखेर माण नदीत पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे पिण्याचे पाणी, शेती आणि पशुधनासाठी निर्माण झालेला तातडीचा प्रश्न काही प्रमाणात मार्गी लागला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड