
रत्नागिरी, 8 जून (हिं.स.) । रत्नागिरी जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे आणि मोहोर गळाल्यामुळे आंबा, काजू पिकांचे नुकसान झाले आहे. प्राथमिक सर्वेक्षणात २८ हजार ९७५ शेतकरी बाधित झाले असून, त्याचा ५२ हजार हेक्टर क्षेत्रावरील बागांना तडाखा बसल्याचे समोर आले आहे.
शेतकरी हेक्टरी तीन लाखांचे आंबा उत्पन्न घेतो; मात्र शासनाकडून हेक्टरी फक्त २२ हजार ५०० रुपयांची मदत मिळणार आहे. त्यात भरपाईला २ हेक्टरची मर्यादा असल्याने शेतकऱ्यांची निव्वळ थट्टा असल्याचा आरोप बागायतदारांनी केला आहे.नियमांनुसार हेक्टरी २२ हजार ५०० रुपये भरपाई दिली जाते. ही मदत केवळ दोन हेक्टरच्या मयदिपर्यंत आहे. बागायतदारांच्या मते, आंबा पिकातून हेक्टरी सुमारे तीन लाख रुपयांचे उत्पन्न मिळते. त्यानुसार हे नुकसान सुमारे १५६ कोटींच्या घरात जाते.शासनाने ही भरपाईची रक्कम वाढवून द्यावी आणि दोन हेक्टरची जाचक मर्यादाही शिथिल करावी, अशी मागणी शेतकरी संघटनांकडून केली जात आहे. प्राथमिकदृष्ट्या ५२ हजार हेक्टरवरचे नुकसान झाले आहे, तसा अहवाल दोन दिवसांत शासनाला सादर करणार असल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले यांनी सांगितलं आहे.
गेले दोन महिने कृषी विभागामार्फत पंचनामे सुरू होते ते काल पूर्ण झाले आहेत. यामध्ये तलाठी, ग्रामसेवक आणि कृषी सहाय्यक यांच्या संयुक्त पथकाने प्रत्यक्ष बांधावर जाऊन पाहणी केली तर काही ठिकाणी ग्रामपंचायतीमधून खातेदार शेतकऱ्यांची माहिती संकलित केली आहे. यामुळे जिल्ह्यात सुमारे 28 हजार 975 शेतकरी व बागायतदारांना हानी पोहोचली आहे.शासन निकषानुसार प्राथमिक दृष्ट्या 52 हजार हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे त्यात आंब्याचे 31 हजार 993 हेक्टर तर काजूचे 20 हजार 12 हेक्टर क्षेत्र आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी