
सोलापूर, 09 जून (हिं.स.) : स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधानपरिषद निवडणुकीसाठी महायुतीचे उमेदवार तथा माजी आमदार राजेंद्र राऊत यांनी आमदार विजयकुमार देशमुख यांची पुन्हा एकदा भेट घेतली. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेली ही चौथी भेट असून, पक्षनिष्ठेसोबतच वैयक्तिक मैत्रीच्या नात्यामुळेही आमदार देशमुख प्रचाराच्या मैदानात सक्रिय झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये झालेल्या काही राजकीय घडामोडींमुळे आमदार देशमुख नाराज असल्याची चर्चा होती. त्यांच्या विरोधकांना पक्षात प्रवेश देणे तसेच समर्थकांना डावलल्याच्या मुद्द्यावरून पालकमंत्री जयकुमार गोरे आणि देशमुख यांच्यात मतभेद निर्माण झाल्याचे बोलले जात होते. त्यामुळे विधानपरिषद निवडणुकीच्या निर्णय प्रक्रियेपासूनही ते काहीसे दूर असल्याचे चित्र निर्माण झाले होते.मात्र, महायुतीने राजेंद्र राऊत यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर राजकीय समीकरणे बदलताना दिसत आहेत. पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल करतानाही आमदार देशमुख उपस्थित होते. त्यानंतर राऊत यांनी निवडणुकीच्या अनुषंगाने देशमुख यांची वारंवार भेट घेतली असून सोमवारी झालेली भेट ही चौथी ठरली.देशमुख यांच्या संपर्क कार्यालयात झालेल्या बैठकीत विधानपरिषद निवडणुकीची रणनीती, प्रचाराचे नियोजन आणि मतदारांपर्यंत प्रभावीपणे पोहोचण्याच्या विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली.
बैठकीनंतर राजेंद्र राऊत आणि विजयकुमार देशमुख यांनी संयुक्तपणे मंगळवेढा, पंढरपूर आणि सांगोला दौऱ्यास सुरुवात केली.या दौऱ्यात आमदार समाधान आवताडे, जिल्हा बँकेचे माजी उपाध्यक्ष बबनराव आवताडे, माजी आमदार प्रशांत परिचारक, आमदार बाबासाहेब देशमुख तसेच माजी आमदार शहाजी पाटील यांच्याशी चर्चा करून निवडणुकीसंदर्भातील पुढील रणनीती निश्चित करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड