
परभणी, 09 जून (हिं.स.) : जिल्ह्यातील शासकीय, अशासकीय अनुदानित तसेच कायम विनाअनुदानित संस्थांमध्ये शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या इयत्ता अकरावी प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी प्रवेश घेताना विशेष दक्षता घ्यावी, असे आवाहन जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी विकास अरडे यांनी केले आहे.
पूर्व व्यवसायिक, एमसीव्हीसी तसेच द्विलक्षी अभ्यासक्रमांना प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी संबंधित अभ्यासक्रमास शासनाची मान्यता आहे की नाही, याची खात्री करूनच प्रवेश घ्यावा, असे त्यांनी स्पष्ट केले. शासनमान्यता नसलेल्या अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेणे टाळावे, अन्यथा विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ शकते, असा इशाराही त्यांनी दिला.
विद्यार्थी व पालकांनी प्रवेश प्रक्रियेदरम्यान अधिकृत मान्यता प्राप्त अभ्यासक्रमांचीच निवड करावी आणि कोणतीही शंका असल्यास जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी कार्यालय, परभणी येथे संपर्क साधावा, असे आवाहनही विकास अरडे यांनी केले आहे.
दरम्यान, अकरावी प्रवेश प्रक्रियेला प्रारंभ झाल्याने विद्यार्थी व पालकांमध्ये उत्साहाचे वातावरण असून योग्य अभ्यासक्रमाची निवड करण्यासाठी माहिती घेण्यावर भर दिला जात आहे.
---------------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis