
मुंबई, 09 जून (हिं.स.) : राज्यात झालेल्या अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून सुमारे 24 जिल्ह्यांतील 1 लाख 500 एकरांहून अधिक शेतजमीन बाधित झाल्याचा प्राथमिक अंदाज प्रशासनाने व्यक्त केला आहे.
या पार्श्वभूमीवर राज्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी नुकसानग्रस्त भागांचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत उपलब्ध करून देण्याचे स्पष्ट निर्देश जिल्हा प्रशासनाला दिले आहेत.
बारामती तालुक्यातील वडापुरी, सुरवड, गणेशवाडी, बावडा, टणू, पिंपरी बुद्रुक आणि लाखेवाडी परिसरात झालेल्या नुकसानीची पाहणी कृषीमंत्र्यांनी प्रत्यक्ष शेतबांधावर जाऊन केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांना धीर दिला आणि शासन त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचा विश्वास दिला.
हवामान बदलामुळे अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यांचे प्रमाण वाढत असल्याचे नमूद करत कृषीमंत्र्यांनी प्रशासनाला अधिक दक्ष राहण्याच्या सूचना दिल्या. प्रत्येक बाधित शेतकऱ्याचा पंचनामा पारदर्शकपणे आणि वेळेत पूर्ण करण्याचे आदेश त्यांनी दिले असून, कृषी विभागाने सर्व शासकीय योजनांचा लाभ थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावा असेही त्यांनी सांगितले.
राज्य सरकारच्या आगामी कृषी धोरणांचा उल्लेख करताना त्यांनी सांगितले की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेला मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाली असून, या योजनेमुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.
मुख्य मुद्दे:-
24 जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाचा फटका
1 लाख 500 एकरांहून अधिक शेती बाधित
फळबागा, भाजीपाला व काढणीला आलेली पिके उद्ध्वस्त
जिल्हा प्रशासनाला तात्काळ पंचनाम्याचे आदेश
नुकसानभरपाई लवकरात लवकर देण्याचे आश्वासनशेतकऱ्यांना शासकीय योजनांचा थेट लाभ देण्यावर भर
प्रशासनाकडून सध्या सर्व बाधित गावांमध्ये सर्वेक्षण वेगाने सुरू असून पुढील काही दिवसांत अंतिम नुकसान अहवाल सादर केला जाण्याची शक्यता आहे.
-----------------------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis