
रत्नागिरी, 8 जून (हिं.स.) : संगमेश्वर तालुक्यातील साखरपा–देवरूख मार्गावर आज दुपारी पहिल्याच पावसाच्या तडाख्यात एक मोठे झाड रस्त्यावर कोसळल्याने दोन्ही बाजूंची वाहतूक सुमारे तीन तास पूर्णपणे ठप्प झाली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
सुमारास साखरपा आणि परिसरात दुपारी सुमारे दीड वाजण्याच्याअचानक जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे उकाड्यापासून नागरिकांना दिलासा मिळाला असून, बळीराजालाही मोठा आधार मिळाल्याचे चित्र दिसत आहे. पावसामुळे रखडलेल्या भातपेरणीच्या कामांना आता वेग येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
मात्र याच वेळी साखरपा–देवरूख मार्गावरील मोर्डे बस थांब्याजवळ एक मोठे झाड अचानक रस्त्यावर उन्मळून पडले. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक दोन्ही बाजूंनी पूर्णपणे ठप्प झाली. परिसरात असलेली अनेक झाडे धोकादायक स्थितीत असल्याचेही स्थानिक नागरिकांनी सांगितले.
पहिल्याच पावसात ही परिस्थिती निर्माण झाल्याने आगामी पावसाळ्यात मोठ्या अपघाताचा धोका संभवतो, अशी चिंता व्यक्त होत आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने लक्ष देऊन रस्त्यालगतची धोकादायक झाडे व फांद्या काढाव्यात, अशी मागणी वाहनचालक आणि स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.
-------------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी