रत्नागिरी : कुणबी परिषदेत लग्न व मृत्यूनंतरच्या अनिष्ट रूढी-परंपरा कायमस्वरूपी बंद करण्याचा ठराव
रत्नागिरी, 9 जून, (हिं.स.) । कोकणातील बहुसंख्य समाज असलेल्या कुणबी समाजामध्ये लग्नविधी व अंत्यविधींसंदर्भात अनेक अनिष्ट रूढी-परंपरा प्रचलित आहेत. त्या कायमच्या बंद करण्याचा ठराव कुणबी परिषदेत मांडण्यात आला. कुणबी समाजोन्नती संघाच्या मुंबई आणि खेड
खेडमधील कुणबी परिषद


रत्नागिरी, 9 जून, (हिं.स.) । कोकणातील बहुसंख्य समाज असलेल्या कुणबी समाजामध्ये लग्नविधी व अंत्यविधींसंदर्भात अनेक अनिष्ट रूढी-परंपरा प्रचलित आहेत. त्या कायमच्या बंद करण्याचा ठराव कुणबी परिषदेत मांडण्यात आला.

कुणबी समाजोन्नती संघाच्या मुंबई आणि खेड ग्रामीण शाखेच्या संयुक्त विद्यमाने जोगळे बंधू मल्टिपर्पज हॉल येथे एकदिवसीय कुणबी परिषद पार पडली. अनिष्ट रूढी-परंपरांमुळे कुणवबी समाजाचे आर्थिक व सामाजिक नुकसान होत असल्याने अनेकांच्या मनात प्रश्न व मतभेद होते. या अनिष्ट प्रथांचे निर्मूलन करण्याचे कुणबी परिषदेतर्फे ठरविण्यात आले. यावेळी कुणबी समाजोन्नती संघाचे अध्यक्ष अनिलजी नवगणे, सरचिटणीस कृष्णा वणे, जिल्हा परिषद माजी शिक्षण सभापती सहदेव बेटकर, जिल्हाध्यक्ष प्रकाश मांडवकर, शिवराज्य संघटनेचे प्रदेशाध्यक्ष तथा ओबीसी संघर्ष समितीचे प्रवक्ते ॲड. रोशन पाटील, निवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी विजय थोरे, सचिन धाडवे, जि. प. सदस्य, संघाचे सहसचिव माधव कांबळे, युवा सरचिटणीस सचिन रामाणे, कुणबी विवाह मंडळ सरचिटणीस राजेश मेटकर, संघाचे कार्यकारिणी सदस्य व प्रतिनिधी आदी उपस्थित होते.

समाजातील विवाह समारंभातील रूढी, परंपरा व चालीरीती तसेच मृत्यूनंतरचे विधी आणि त्यामागील सामाजिक व धार्मिक पैलू यांवर सखोल चर्चा करण्यात आली. या परिषदेला हजारोंच्या संख्येने कुणबी समाजबांधव तसेच समाजाचे नेतृत्व करणारे प्रतिनिधी उपस्थित होते.

परिषदेत तज्ज्ञांचे मार्गदर्शन, मुक्त चर्चा, विचारमंथन आणि विविध सूचनांवर सखोल विचारविनिमय करण्यात आला. समाजात प्रचलित असलेल्या अनिष्ट विधवा प्रथेच्या निर्मूलनाबाबत राज्य शासनाने २२ मे २०२२ रोजी शासन निर्णय जारी केला होता. त्याप्रमाणे समाजाने विचारविनिमय करून अंमलबजावणी करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय परिषदेत घेण्यात आला.

सामाजिक समारंभांवरील अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी अनेक महत्त्वाचे ठराव संमत करण्यात आले. त्यामध्ये लग्नसमारंभात डीजे वाजवण्यास बंदी, प्री-वेडिंग कार्यक्रम, विवाहसोहळ्यात मांसाहार व मद्य देण्यास बंदी, ओटी भरण्यासाठी साडी देण्याची प्रथा बंद करणे, तसेच मंगलाष्टके म्हणताना तांदळाऐवजी फुलांचा वापर करणे इत्यादींचा समावेश आहे.

साखरपुडा कमी खर्चात व मर्यादित उपस्थितीत करण्याचाही निर्णय घेण्यात आला. या निर्णयांमुळे विवाह समारंभ अधिक साधेपणाने व कमी खर्चात पार पडतील तसेच समाजाची प्रतिष्ठा व सामाजिक बांधिलकी अधिक दृढ होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

ॲड. रोशन पाटील यांनी विवाह समारंभातील विविध प्रथा, त्यांचे सामाजिक परिणाम आणि काळानुरूप आवश्यक बदल याविषयी मार्गदर्शन केले.

विजय थोरे यांनी मृत्यूनंतरचे विधी, सामाजिक जबाबदाऱ्या आणि अनावश्यक खर्च टाळून समाजहित जपण्यासाठी आपले विचार मांडले.

अनिल नवगणे, सरचिटणीस कृष्णा वणे, सहदेव बेटकर, प्रकाश मांडवकर यांनी परिषदेचे महत्त्व, समाज संघटन, शिक्षण, सामाजिक परिवर्तन आणि एकजुटीचे महत्त्व अधोरेखित केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शंकर बाईत होते, तर स्वागताध्यक्ष म्हणून कृष्णा आग्रे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. खेड ग्रामीण शाखेचे सचिव सचिन गोवळकर यांनी प्रास्ताविक केले. मुंबई शाखा सचिव संदीप दोडेकर व ग्रामीण खजिनदार सुधीर वैराग, ग्रामीण युवा अध्यक्ष सुरज जोगळे, महिला अध्यक्ष ममता भुवड इत्यादींनी परिषदेतील दोन्ही विषयांवर प्रभावीपणे चर्चा घडवून आणली.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande