
छत्रपती संभाजीनगर, ९ जून (हिं.स.) : खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर खतांची मागणी वाढत असताना कृषी विभागाने सुरू केलेल्या नव्या खत बुकिंग ॲपमुळे शेतकरी आणि कृषी सेवा केंद्र चालकांना विविध अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे समोर आले आहे.
ॲपमधील तांत्रिक बिघाड, वारंवार सर्व्हर डाऊन होणे, नेटवर्क समस्या तसेच अनेक शेतकऱ्यांकडे स्मार्टफोन नसणे यामुळे खत वितरण प्रक्रियेत मोठे अडथळे निर्माण होत आहेत. परिणामी शेतकऱ्यांना वेळेत खते मिळण्यात अडचणी येत असल्याची तक्रार कृषी सेवा केंद्र संघटनेने केली आहे.
या पार्श्वभूमीवर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांची भेट घेऊन हे ॲप तात्काळ बंद करून पूर्वीप्रमाणे सुलभ व शेतकरीहिताची वितरण व्यवस्था लागू करण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात निवेदनही सादर करण्यात आले आहे.
या विषयाची गंभीर दखल घेण्यात आली असून कृषिमंत्र्यांशी चर्चा करून लवकरच योग्य तोडगा काढण्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा केला जाईल, असे आश्वासन अधिकाऱ्यांकडून देण्यात आले आहे.
शेतकऱ्यांना कोणताही त्रास होऊ नये आणि खरीप हंगामासाठी आवश्यक खते वेळेत उपलब्ध व्हावीत, यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू असल्याचेही प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.
------------------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis