दरडी रोखण्यासाठी रायगडात २० लाख बांबूंची लागवड
रायगड, 01 जुलै (हिं.स.)। रायगड जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे वाढत्या दरडी, मातीची धूप आणि भूजल पातळी घटण्याच्या समस्येवर प्रभावी उपाय म्हणून प्रशासनाने यंदा मोठ्या प्रमाणावर बांबू लागवडीचा महत्त्वाकांक्षी आराखडा तयार केला आहे. आगामी पावसाळ्यात जिल्ह्यात
2 million bamboo plants to be planted in Raigad to prevent landslides.


रायगड, 01 जुलै (हिं.स.)। रायगड जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे वाढत्या दरडी, मातीची धूप आणि भूजल पातळी घटण्याच्या समस्येवर प्रभावी उपाय म्हणून प्रशासनाने यंदा मोठ्या प्रमाणावर बांबू लागवडीचा महत्त्वाकांक्षी आराखडा तयार केला आहे. आगामी पावसाळ्यात जिल्ह्यात तब्बल २० लाख बांबू रोपांची लागवड करण्यात येणार असून, दरडग्रस्त आणि मातीची धूप होत असलेल्या भागांना प्राधान्य दिले जाणार आहे.

गेल्या काही वर्षांत रायगडमध्ये अतिवृष्टीमुळे डोंगरउतारांवरील माती वाहून जाण्याचे प्रमाण वाढले असून अनेक गावांमध्ये दरडी कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर माती घट्ट धरून ठेवणारा आणि कमी कालावधीत वाढणारा बांबू हा प्रभावी पर्याय ठरत असल्याने वन विभाग, सामाजिक वनीकरण विभाग आणि कृषी विभागाच्या संयुक्त विद्यमाने ही मोहीम राबविण्यात येत आहे.

खरीप हंगाम नियोजन बैठकीत फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांनी बांबू लागवडीचा आढावा घेत कृषी अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांना पडीक जमिनीवर बांबू लागवडीसाठी प्रोत्साहित करण्याच्या सूचना दिल्या. सध्या जिल्ह्यातील ४१ रोपवाटिकांमध्ये बांबू रोप निर्मिती सुरू असून आतापर्यंत ४९ हजार २६९ रोपे तयार झाली आहेत. उर्वरित रोपांची निर्मिती युद्धपातळीवर सुरू आहे.

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत वेश्वी येथील शासकीय रोपवाटिकेत बांबू रोप निर्मितीचा विशेष प्रयोग राबविण्यात येत आहे. या माध्यमातून महिला बचत गट, स्वयं सहायता गट आणि शेतकऱ्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्याबरोबरच पर्यावरण संवर्धनालाही चालना मिळणार आहे.

जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी सांगितले की, जिल्ह्यातील सामूहिक वनहक्क क्षेत्रांवर मोठ्या प्रमाणात बांबू लागवड करण्याचे नियोजन असून, गडचिरोली जिल्ह्यातील मेंढालेखा गावाच्या यशस्वी मॉडेलप्रमाणे रायगडमध्येही शाश्वत वनव्यवस्थापन उभारण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांनी जमिनीची धूप, भूजल पातळीतील घट आणि वाढत्या नैसर्गिक आपत्ती लक्षात घेता शाश्वत बांबू लागवडीचे महत्त्व शेतकऱ्यांना पटवून देण्याचे आवाहन कृषी अधिकाऱ्यांना केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande