आठवड्यात प्रश्न निकाली काढा; अन्यथा मनपात अधिकाऱ्यांना खुर्चीवर बसू देणार नाही! आ. साजिद खान पठाण यांचा प्रशासनाला निर्वाणीचा इशारा
अकोला, 01 जुलै (हिं.स.)। पहिल्याच पावसात अकोला महानगरपालिकेच्या विकासकामांचे आणि नालेसफाईच्या दाव्यांचे अक्षरशः पितळ उघडे पडल्याने संतप्त झालेल्या पश्चिम अकोला मतदारसंघाचे आमदार साजिद खान पठाण यांनी सोमवारी काँग्रेसच्या नगरसेवकांसह थेट मनपा आयुक्
Photo


अकोला, 01 जुलै (हिं.स.)।

पहिल्याच पावसात अकोला महानगरपालिकेच्या विकासकामांचे आणि नालेसफाईच्या दाव्यांचे अक्षरशः पितळ उघडे पडल्याने संतप्त झालेल्या पश्चिम अकोला मतदारसंघाचे आमदार साजिद खान पठाण यांनी सोमवारी काँग्रेसच्या नगरसेवकांसह थेट मनपा आयुक्तांची भेट घेत प्रशासनाला धारेवर धरले. शहरातील रस्ते, नालेसफाई, भूमिगत गटार योजनेतील अनागोंदी आणि नागरिकांच्या हालअपेष्टांचा मुद्दा आक्रमकपणे मांडत, आठवड्याच्या आत सर्व प्रश्न निकाली काढा; अन्यथा संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांना त्यांच्या खुर्चीवर बसू देणार नाही, असा निर्वाणीचा इशारा त्यांनी दिला.

मनपा आयुक्तांच्या दालनात झालेल्या बैठकीत आमदार पठाण यांनी शहरातील विविध भागांतील गंभीर समस्या मांडल्या. पहिल्याच पावसात अनेक प्रभागांमध्ये नाल्यांचे पाणी थेट नागरिकांच्या घरात शिरल्याने प्रशासनाच्या नालेसफाईच्या दाव्याची पोलखोल झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अनेक ठिकाणी चिखलाचे साम्राज्य पसरले असून नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाल्याची तीव्र नाराजी त्यांनी व्यक्त केली.

भूमिगत गटार योजनेअंतर्गत ज्या रस्त्यांच्या बांधकामासाठी कोणताही निधी मंजूर नाही, असे रस्तेही कंत्राटदाराने खोदून ठेवले आहेत. त्यामुळे नागरिकांना ये-जा करताना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. या बेजबाबदार कारभाराची गंभीर दखल घेत संबंधित कंत्राटदाराला तातडीने समज द्यावी, विनाकारण रस्ते खोदण्यास मज्जाव करावा आणि खोदलेल्या रस्त्यांच्या पुनर्बांधणीसाठी त्वरित प्रस्ताव सादर करून निधी उपलब्ध करावा, अशी मागणी त्यांनी केली. तोपर्यंत नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी अशा रस्त्यांवर तातडीने मुरूम टाकून वाहतुकीयोग्य करण्यात यावे, अशी सूचनाही त्यांनी प्रशासनाला केली.

याशिवाय शहरातील अनेक नाल्यांची सफाई अपुरी राहिल्यामुळे पावसाचे पाणी थेट घरांमध्ये घुसत असल्याचा मुद्दा उपस्थित करत, सर्व नाल्यांची युद्धपातळीवर पुन्हा स्वच्छता करण्यात यावी तसेच पावसाच्या पाण्याचा योग्य निचरा होण्यासाठी आवश्यक त्या ठिकाणी नवीन आउटलेटची निर्मिती करण्यात यावी, असे निर्देशही आमदार पठाण यांनी दिले.

यावर मनपा आयुक्तांनी सर्व बाबी गांभीर्याने ऐकून घेत चार दिवसांच्या आत संबंधित समस्या सोडविण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन दिले. मात्र, आश्वासनांची पूर्तता झाली नाही तर लोकशाही मार्गाने तीव्र जनआंदोलन उभारण्यात येईल आणि निष्क्रिय अधिकारी-कर्मचाऱ्यांना त्यांच्या खुर्च्यांवर बसू दिले जाणार नाही, असा स्पष्ट आणि सणसणीत इशारा आमदार पठाण यांनी बैठकीनंतर दिला.

या बैठकीला मनपाचे झोन अधिकारी, पाणीपुरवठा विभाग, स्वच्छता विभागासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी तसेच काँग्रेसचे नगरसेवक व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande