
• ताथवडेतील जमिनीवर आता पिंपरी-चिंचवड पोलिसांचे 'राज'
• गृह विभागाला जागा हस्तांतरित
मुंबई, 01 जुलै (हिं.स.) : पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या मुख्यालय व परेड ग्राऊंडचा प्रश्न मार्गी लागला आहे. पुणे जिल्ह्यातील ताथवडे येथील पशुसंवर्धन विभागाच्या अधिपत्याखालील वळुमाता प्रक्षेत्राची २० हेक्टर ( ५० एकर ) जमीन पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाला प्रदान करण्यास राज्य सरकारने अधिकृत मंजुरी दिली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विशेष सूचनेनुसार महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पुढाकाराने महसूल व वन विभागाने या जमीन प्रदानाचा अत्यंत महत्त्वाचा शासन निर्णय आज ( दि. १ जुलै रोजी ) जारी केला आहे.
भोगवटामूल्यरहित आणि महसूलमुक्त जमीन
पोलीस आयुक्तालय मुख्यालय, परेड ग्राऊंड व इतर अनुषंगिक शासकीय बाबींच्या उभारणीसाठी ही जागा पोलीस आयुक्त, पिंपरी-चिंचवड (गृह विभाग) यांना 'भोगवटामूल्यरहित' आणि 'महसूलमुक्त' किंमतीने म्हणजेच मोफत वर्ग करण्यात आली आहे.
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, वळुमाता प्रक्षेत्राच्या एकूण ६७ हेक्टर ९४ आर. क्षेत्रापैकी २० हेक्टर जमीन सलग एका बाजूला काढून ती गृह विभागाच्या ताब्यात देण्याचे निर्देश पुणे जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.
प्रक्षेत्राच्या सुरक्षेसाठी 'ध्वनीरोधक' बसवणे अनिवार्य
पशुसंवर्धन विभागाच्या ताथवडे येथील शासकीय पशु पैदास प्रक्षेत्राच्या 'जैवसुरक्षा' व्यवस्थेला पोलीस मुख्यालयामुळे आणि परेड ग्राऊंडमुळे कोणतीही बाधा येऊ नये, याची पूर्ण काळजी घेण्याच्या अटी शासनाने घातल्या आहेत. मुख्यालयाच्या हालचालींमुळे येथील प्राण्यांना त्रास होऊ नये, म्हणून पोलीस आयुक्त, पिंपरी-चिंचवड यांनी स्वखर्चाने त्या भागात 'ध्वनीरोधक' बसवावेत, असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच जागा हस्तांतरणामुळे रस्ते, पाणी, वीज या प्राथमिक सुविधांमध्ये बदल करावा लागल्यास त्याचा खर्चही गृह विभागालाच करावा लागेल.
जमिनीचा ताबा मिळाल्यापासून पुढील तीन वर्षांच्या आत मंजूर कारणासाठी प्रत्यक्ष बांधकाम आणि वापर सुरू करणे बंधनकारक राहील, अशी अट असून या शासकीय जमिनीचा वापर केवळ मंजूर प्रयोजनासाठीच करावा लागेल, अटींचा भंग झाल्यास जमीन पुन्हा शासन जमा केली जाईल.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी