
परभणी, 01 जुलै (हिं.स.)।हरित ऊर्जा, स्वच्छ पर्यावरण आणि शाश्वत विकासाला चालना देण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी “गो ग्रीन इंडिया ” आणि “सस्टेनेबल मोबिलिटी” ही संकल्पना मांडली आहे. त्या दिशेने सक्रिय कार्य करण्याचे ठरवून, महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत), पुणे यांच्या माध्यमातून राज्यभरात ईव्ही (Electric Vehicle) चार्जिंग स्टेशन व्यवसाय प्रोत्साहन उपक्रम राबविण्यात येत आहे.
या उपक्रमाच्या माध्यमातून युवक, महिला उद्योजक, स्वयं सहाय्यता गट, एमएसएमई घटक तसेच ग्रामीण भागातील इच्छुक उद्योजकांना ईव्ही चार्जिंग स्टेशन व्यवसाय उभारण्यासाठी आवश्यक प्रशिक्षण, तांत्रिक मार्गदर्शन, व्यवसाय सल्ला आणि आर्थिक सहाय्य उपलब्ध करून दिले जाणार आहे.
देशामध्ये इलेक्ट्रिक वाहनांचा वापर झपाट्याने वाढत असून आगामी काळात ईव्ही चार्जिंग स्टेशनचे मोठे जाळे उभारण्याची गरज निर्माण झाली आहे. आता पेट्रोल पंपाप्रमाणे अनेक ठिकाणी ईव्ही चार्जिंग स्टेशनची नितांत गरज आहे. महाराष्ट्रामध्येही या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहेत. या संधींचा लाभ राज्यातील युवकांना मिळावा, यासाठी अमृतने हा विशेष उपक्रम हाती घेतला आहे.
ईव्ही चार्जिंग स्टेशन व्यवसायातील संधी : -ईव्ही चार्जिंग स्टेशन उभारणी, संचालन व व्यवस्थापन, चार्जिंग उपकरणांची देखभाल, सौरऊर्जेवर आधारित चार्जिंग सुविधा, ग्रीन एनर्जी सेवा, ईव्ही संबंधित तांत्रिक सेवा, फ्रँचायझी मॉडेल व्यवसाय तसेच ग्रामीण भागामध्ये चार्जिंग हब उभारणी अशा विविध क्षेत्रांमध्ये व्यवसायाच्या संधी उपलब्ध होणार आहेत. भविष्यात ईव्ही क्षेत्र हे सर्वाधिक वेगाने वाढणाऱ्या उद्योग क्षेत्रांपैकी एक ठरणार असल्याने प्रशिक्षित उद्योजकांना मोठ्या प्रमाणावर लाभ मिळणार आहे.
उपक्रमाचे वैशिष्ट्य : -अमृतच्या या विशेष उपक्रमांतर्गत सहभागी लाभार्थ्यांना ईव्ही क्षेत्राविषयी मूलभूत ते प्रगत प्रशिक्षण, व्यवसाय नियोजन, प्रकल्प अहवाल तयार करणे, चार्जिंग स्टेशन स्थापनेसाठी आवश्यक तांत्रिक मार्गदर्शन, शासनाच्या विविध योजनांची माहिती, बाजारपेठेचा अभ्यास आणि व्यवसाय व्यवस्थापनाचे मार्गदर्शन दिले जाणार आहे. या क्षेत्रातील भारतीय स्वदेशी कंपन्या आणि तज्ञ मार्गदर्शक यांच्या सहाय्याने हा उपक्रम यशस्वी केला जाणार आहे. याशिवाय अमृतच्या वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेचा लाभही पात्र लाभार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात येणार असून त्यामुळे व्यवसाय सुरू करण्यासाठी आर्थिक सहाय्य मिळण्यास मदत होणार आहे.
पात्रता व अटी : -या उपक्रमाचा लाभ घेण्यासाठी युवक-युवती, महिला उद्योजक, स्वयं सहाय्यता गट (SHG), एमएसएमई उद्योजक, शेतकरी उत्पादक गट, ग्रामीण उद्योजक तसेच स्वतःचा उद्योग सुरू करू इच्छिणारे नागरिक पात्र राहतील. अमृतच्या वैयक्तिक व्याज परतावा योजनेचा लाभ घेण्यासाठी अमृतच्या लक्षित गटातील उमेदवारांसाठी आवश्यक असलेल्या पात्रता व अटी लागू राहतील.
कोणत्या क्षेत्रात रोजगार व करिअरच्या संधी? -ईव्ही चार्जिंग स्टेशन व्यवसायाबरोबरच ऊर्जा व्यवस्थापन, चार्जिंग नेटवर्क ऑपरेशन, इलेक्ट्रिकल देखभाल, तांत्रिक सेवा, ग्रीन एनर्जी प्रकल्प, ईव्ही उपकरण विक्री व सेवा तसेच उद्योजकता विकास या क्षेत्रांमध्ये रोजगार व करिअरच्या नवीन संधी निर्माण होणार आहेत. ग्रामीण भागातील युवकांसाठीही हा व्यवसाय उत्पन्नाचे प्रभावी साधन ठरू शकतो.
स्वयंरोजगारासाठी विशेष सहाय्य : स्वतःचा अमृत ईव्ही चार्जिंग स्टेशन व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्या लाभार्थ्यांना अमृतकडून आवश्यक मार्गदर्शन, व्यवसाय सल्ला, मदत तसेच अमृतच्या वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेचा लाभ दिला जाईल. त्यामुळे नवोदित उद्योजकांना व्यवसाय उभारण्यासाठी विशेष मदत मिळणार आहे.
कुठे आणि कसा अर्ज करायचा? : अमृत ईव्ही चार्जिंग स्टेशन व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी अमृत संस्थेच्या mahaamrut.org.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन, ‘योजना’ या विभागात ‘विशेष योजना’ या मेनूअंतर्गत ‘EV Charging Station Partner’ या पर्यायामध्ये ऑनलाइन अर्ज करावा. अर्जासोबत आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करणे बंधनकारक राहील. अधिक माहितीसाठी संबंधित जिल्ह्यातील अमृत कार्यालयाशी संपर्क साधावा. वर नमूद केलेल्या संकेतस्थळावर राज्यातील सर्व जिल्ह्यांच्या जिल्हा व्यवस्थापकांचे संपर्क क्रमांक, कार्यालयाचा पत्ता व इतर तपशील उपलब्ध आहेत.
हरित महाराष्ट्रासाठी महत्त्वाचा उपक्रम : -ईव्ही चार्जिंग स्टेशन व्यवसायामुळे पर्यावरणपूरक वाहतूक व्यवस्थेला चालना मिळणार असून राज्यातील युवक, महिला आणि ग्रामीण उद्योजकांसाठी रोजगार व स्वयंरोजगाराच्या नव्या संधी निर्माण होणार आहेत. हरित ऊर्जा, स्वच्छ पर्यावरण आणि आत्मनिर्भर महाराष्ट्र घडविण्याच्या दिशेने हा महत्त्वपूर्ण उपक्रम ठरणार आहे.
ईव्ही चार्जिंग स्टेशन व्यवसायामध्ये भविष्यातील संधी : -चार्जिंग स्टेशन उभारणी, संचालन, व्यवस्थापन, उपकरणांची देखभाल, सौरऊर्जेवर आधारित चार्जिंग सुविधा, ग्रीन एनर्जी सेवा, तांत्रिक सेवा, फ्रँचायझी व्यवसाय आणि ग्रामीण चार्जिंग हब उभारणी अशा विविध संधी उपलब्ध आहेत.
प्रशिक्षण / मार्गदर्शनाचे स्वरूप : -ईव्ही क्षेत्राविषयी मूलभूत ते प्रगत प्रशिक्षण, व्यवसाय नियोजन, प्रकल्प अहवाल तयार करणे, तांत्रिक मार्गदर्शन, बाजारपेठेचा अभ्यास आणि व्यवसाय व्यवस्थापनाचे प्रशिक्षण तसेच पूरक व्यवसाय करण्यासंदर्भात मार्गदर्शन दिले जाईल. उपक्रमांतर्गत आर्थिक सहाय्याची सुविधा : अमृतच्या लक्षित गटातील पात्र उमेदवारांना अमृतच्या वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेचा लाभ उपलब्ध होऊ शकेल.
रोजगार व करिअरच्या उपलब्ध संधी : ऊर्जा व्यवस्थापन, चार्जिंग नेटवर्क ऑपरेशन, इलेक्ट्रिकल देखभाल, ग्रीन एनर्जी प्रकल्प, ईव्ही उपकरण विक्री व सेवा तसेच उद्योजकता विकास या क्षेत्रांमध्ये रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होतील.ग्रामीण भागातील युवकांना फायदेशीर : ग्रामीण भागात चार्जिंग हब उभारणी व ईव्ही सेवा केंद्रांच्या माध्यमातून उत्पन्नाचे नवे स्रोत निर्माण होतील आणि स्वयंरोजगाराच्या संधी वाढतील.
स्वयंरोजगार सुरू करू इच्छिणाऱ्यांना सहाय्य : व्यवसाय उभारणीसाठी मार्गदर्शन, तांत्रिक सल्ला, व्यवसाय नियोजन मदत आणि अमृतच्या वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेचा लाभ दिला जाईल. अर्ज करण्याची प्रक्रिया : -इच्छुक उमेदवारांनी अमृतच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ‘योजना’ विभागातील ‘EV Charging Station’ या पर्यायामध्ये ऑनलाइन अर्ज करावा.
महाराष्ट्राला होणारा फायदा : -अमृतच्या या नाविन्यपूर्ण उपक्रमामुळे पर्यावरणपूरक वाहतूक व्यवस्थेला चालना मिळेल, हरित ऊर्जा वापर वाढेल आणि युवक, महिला व ग्रामीण उद्योजकांसाठी मोठ्या प्रमाणात रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण होतील. भविष्यात पर्यावरण रक्षण हा मुद्दा अतिशय गंभीर होणार आहे. पर्यावरणाचा समतोल बिघडल्याने त्याचे दुष्परिणाम जाणवत आहेत. पर्यावरण रक्षणाच्या सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवून अमृतने हा उपक्रम हाती घेतला असून, या उपक्रमामुळे पर्यावरण संरक्षणाबरोबरच स्वयंरोजगाराच्या संधीही मोठ्या प्रमाणात उपलब्ध होणार आहेत.
अमृतच्या अधिकृत संकेतस्थळावर राज्यातील सर्व जिल्हा व्यवस्थापकांचे संपर्क क्रमांक, कार्यालयांचे पत्ते व इतर माहिती उपलब्ध आहे. माहितीसाठी https://mahaamrut.org.in/coordinators-contact या लिंकला भेट द्यावी. अधिक माहितीसाठी अमृत जिल्हा कार्यालय,जुनी प्रशासकीय इमारत, पहिला मजला,बी.एस.एन.एल. कार्यालयाच्या बाजूला, परभणी येथे संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा व्यवस्थापक अनिरुध्द काटे यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis