
अमरावती, 01 जुलै (हिं.स.)| हॉटेल्स चौकाचौकात असलेल्या नास्त्या किंवा अगदी मिठाईच्या दुकानांमध्ये एकाच खाद्यतेलाचा वारंवार वापर करून त्यात वडे, भजी, समोसे तळण्याचा जीवघेणा खेळ सुरू आहे. अनेकदा हे तेल काळेकुट्ट होईपर्यंत वापरले जाते. मात्र, अशा वापरलेल्या तेलाचा पुनर्वापर करणे आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक असून, प्रशासनाने आता याविरोधात कंबर कसली आहे.
अशा तेलाला आता 'घातक कचरा' म्हणून वर्गीकृत करण्यात आले असून, त्याचा पुनर्वापर करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाईचा इशारा अमरावती येथील अन्न व औषध प्रशासनाचे दिला आहे. त्यासाठी परिपत्रक ही काढण्यात आले आहे. वापरलेले तेल कमी किमतीत लहान विक्रेत्यांना विकणे किंवा तेच तेल पुन्हा-पुन्हा वापरणे हा अन्न सुरक्षा कायद्यानुसार गंभीर गुन्हा आहे. या मोहिमेमुळे आता सलग तेल उकळणाऱ्या हॉटेलचालकांचे धाबे दणाणले आहेत.
घरातही तेलाचा पुनर्वापर टाळा
हा धोका फक्त हॉटेलपुरता मर्यादित नाही. घरातही एकदा तळलेले तेल पुन्हा-पुढी वापरण्याची महिलांची सवय असते. घरातही तेल जास्तीत जास्त एकदाच पुनर्वापरात आणावे (तेही फक्त भाजीसाठी). पुरी किंवा भजी तळलेले तेल पुन्हा नव्याने तळण्यासाठी कधीही वापरू नका, घरामध्येही आजारांना आमंत्रण देणारी ही सवय तातडीने बदलणे गरजेचे आहे.
अन्नसुरक्षा व मानके कायदा २००६ अंतर्गत, दोषी विक्रेत्यांवर कडक कारवाईची तरतूद आहे. एफडीएचे अधिकारी आता हॉटेलमधील तेलाची येट 'टीपीसी मीटर'द्वारे जागेवरच नपासणी करणार आहेत. तेल दूषित आढळल्यास मालकाचा परवाना रद्द होऊ शकतो, तसेच अन्नपदार्था जप्त करून दोन लाखांपासून ते पाच लाख रुपयांपर्यंत दंड आणि गंभीर प्रकरणात तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी