
अकोला, 01 जुलै (हिं.स.)।
अकोला शहरातील धोकादायक, जीर्ण व कमकुवत वृक्षांचे तातडीने सर्वेक्षण करून नागरिकांच्या सुरक्षेसाठी योग्य उपाययोजना करण्यात याव्यात, या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना अकोला जिल्ह्याच्या वतीने मनपा प्रशासनाला निवेदन देण्यात आले.
अलीकडेच मुंबई येथे मुसळधार पावसामुळे धोकादायक वृक्ष कोसळून एका विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. अशा प्रकारची घटना अकोला शहरात घडू नये यासाठी प्रशासनाने केवळ दुर्घटनेनंतर उपाययोजना न करता आधीच खबरदारी घेणे आवश्यक आहे.
अकोला शहरातील अनेक भागांमध्ये जुने, जीर्ण व धोकादायक अवस्थेतील वृक्ष उभे असून पावसाळ्यात वादळी वाऱ्यामुळे हे वृक्ष कोसळून नागरिकांच्या जीवितासह वाहनांचे व सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मनपाने तातडीने शहरातील धोकादायक वृक्षांचे प्रभागनिहाय सर्वेक्षण करून त्यावर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने स्पष्ट इशारा देण्यात आला की, नागरिकांच्या जीवाशी खेळ करणारी कोणतीही हलगर्जीपणा सहन केला जाणार नाही. दुर्घटना होण्याची वाट न पाहता प्रशासनाने तातडीने कार्यवाही करावी, अन्यथा मनसेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल.
सदर निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण सेना जिल्हाध्यक्ष पंकज साबळे, शहर अध्यक्ष सौरभ भगत व मनविसे जिल्हाध्यक्ष रणजीत राठोड यांच्या नेतृत्वाखाली मनपा उपायुक्त (प्रशासन) यांना देण्यात आले.
यावेळी मनपा सभागृह नेते पवन महल्ले हे देखील मनपा कार्यालयात उपस्थित होते.
याप्रसंगी उपशहर अध्यक्ष मुकेश धोंडफळे, अमोल भेंडारकर, हर्षल अंभोरे, संतोष स्वर्गीव व प्रेम पाटील मगर उपस्थित होते.
नागरिकांची सुरक्षा ही प्रशासनाची जबाबदारी — निष्काळजीपणा खपवून घेणार नाही! असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने देण्यात आला.
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे