
ड, 01 जुलै (हिं.स.) : बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ येथे झालेल्या तोहीद खान या तरुणाच्या निर्घृण हत्या प्रकरणाचे पडसाद राज्य विधीमंडळात उमटले. या घटनेवर आमदार धनंजय मुंडे यांनी सभागृहात औचित्याचा मुद्दा उपस्थित करत सरकारचे लक्ष वेधले.
परळीतील तोहीद खान याची नशेखोरीच्या पार्श्वभूमीवर अत्यंत क्रूर पद्धतीने हत्या झाल्याचे सांगत, बीड जिल्ह्यात वाढती गुंडगिरी आणि अमली पदार्थांच्या समस्येबाबत त्यांनी तीव्र चिंता व्यक्त केली. या प्रकरणाचा सखोल तपास करून पीडित कुटुंबाला तातडीने आर्थिक मदत देण्याची मागणीही त्यांनी केली.
सभागृहात बोलताना मुंडे यांनी सांगितले की, ही घटना केवळ एक गुन्हा नसून जिल्ह्यात वाढत चाललेल्या नशेखोरीच्या विळख्याचे गंभीर उदाहरण आहे. या प्रकरणानंतर पोलिसांनी 48 तासांच्या आत दोन आरोपींना अटक केल्याबद्दल त्यांनी पोलिसांचे कौतुक केले, मात्र तपास अधिक सखोल करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या प्रकरणामागे आणखी कोणते सूत्रधार आहेत का, याचा शोध घेऊन सर्व संबंधित आरोपींना अटक करावी, अशी मागणीही त्यांनी केली. तसेच बीड जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेवर सविस्तर चर्चा करण्याची परवानगी देण्यात यावी आणि सरकारने आज संध्याकाळपर्यंत अधिकृत निवेदन सादर करावे, अशी विनंतीही त्यांनी केली.
--------------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis