
जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात कर्जमाफीची रक्कम जमा होणार; आधार लिंक अनिवार्य
लातूर, 01 जुलै (हिं.स.)।
राज्य शासनाने बळीराजाला दिलासा देण्यासाठी जाहीर केलेल्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजने’ची अंमलबजावणी अंतिम टप्प्यात पोहोचली असून पात्र शेतकऱ्यांनी आपल्या कर्ज खात्याला आधार क्रमांक संलग्न करावा, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था विष्णू पोतंगले यांनी केले आहे.
आधार प्रमाणीकरण पूर्ण झाल्यानंतर जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर लाभाची रक्कम जमा करण्याचे सहकार विभागाचे नियोजन आहे. या महत्त्वाकांक्षी योजनेमुळे राज्यातील सुमारे ५६ लाख शेतकऱ्यांना तब्बल ३६,५०० कोटी रुपयांची मदत मिळणार आहे.
सहकार आयुक्त, निबंधक आणि जिल्हा बँकर्स समितीकडून व्यापारी व सहकारी बँकांना पात्र शेतकऱ्यांचे आधार क्रमांक संकलित करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कर्ज खात्याची माहिती अपलोड झाल्यानंतर प्रत्येक पात्र शेतकऱ्याला स्वतंत्र कर्ज खातेनिहाय क्रमांक दिला जाणार आहे. पात्र लाभार्थ्यांची यादी बँक शाखा, ग्रामपंचायत, तलाठी कार्यालय आणि पोर्टलवर प्रसिद्ध केली जाणार आहे.
आधार पडताळणी पूर्ण झाल्यानंतर शासनाकडून लाभाची रक्कम थेट संबंधित शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात जमा केली जाणार आहे. तसेच लाभार्थी शेतकऱ्यांना चालू हंगामासाठी नव्याने पीक कर्ज उपलब्ध करून देण्याच्या सूचना बँकांना देण्यात आल्या आहेत.
योजनेची प्रमुख वैशिष्ट्ये
• २ लाख रुपयांपर्यंतची अल्पमुदतीची पीक कर्जमाफी
• थकीत, पुनर्गठित व फेरपुनर्गठित कर्जांचाही समावेश
• २ लाखांपेक्षा जास्त कर्ज असल्यास अतिरिक्त रक्कम भरल्यानंतर लाभ
नियमित कर्जफेड करणाऱ्यांना विशेष लाभ
नियमित व प्रामाणिकपणे कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर अनुदान देण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, यापूर्वीच्या कर्जमाफी योजनांचा लाभ घेतलेले शेतकरीही या योजनेतील प्रोत्साहनासाठी पात्र असतील.
या योजनेचा उद्देश केवळ कर्जमाफी नसून शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे, त्यांचा आत्मविश्वास वाढविणे आणि शेती क्षेत्राला नवी उभारी देणे हा आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी विलंब न करता बँकेत जाऊन कर्ज खाते आधारशी लिंक करून घ्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis