परभणी - ‘बायोमिक्स’ला आंतरराष्ट्रीय मान्यता; इक्रीसॅट कडून 4 टन पुरवठ्याची मागणी
परभणी, 01 जुलै (हिं.स.) शाश्वत, पर्यावरणपूरक आणि जैविक शेतीला चालना देणार्या परभणीतील वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाने विकसित केलेल्या ‘बायोमिक्स’ या अभिनव जैविक उत्पादनाला आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठी मान्यता मिळाली आहे. हैदराबाद येथील आंतररा
परभणी - ‘बायोमिक्स’ला आंतरराष्ट्रीय मान्यता; इक्रीसॅट कडून 4 टन पुरवठ्याची मागणी


परभणी, 01 जुलै (हिं.स.) शाश्वत, पर्यावरणपूरक आणि जैविक शेतीला चालना देणार्या परभणीतील वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाने विकसित केलेल्या ‘बायोमिक्स’ या अभिनव जैविक उत्पादनाला आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठी मान्यता मिळाली आहे. हैदराबाद येथील आंतरराष्ट्रीय अर्ध-शुष्क उष्णकटिबंधीय पीक संशोधन संस्था यांनी या उत्पादनाच्या तब्बल चार टन पुरवठ्याची मागणी नोंदविल्याने विद्यापीठाच्या संशोधन कार्याला जागतिक स्तरावर दाद मिळाल्याचे स्पष्ट झाले आहे.

या पार्श्वभूमीवर विद्यापीठ परिसरातून इक्रीसॅट, हैदराबाद येथे रवाना होणार्या बायोमिक्सच्या ट्रकला विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. (डॉ.) इंद्र मणी यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून रवाना करण्यात आले. यावेळी संशोधन संचालक डॉ. खिजर बेग, अधिष्ठाता डॉ. प्रवीण वैद्य (परभणी), सहयोगी अधिष्ठाता डॉ. शिवाजी शिंदे (गोळेगाव), वनस्पती रोगशास्त्र विभागप्रमुख डॉ. प्रफुल्ल घंटे, मृदाशास्त्र विभागप्रमुख डॉ. हरिहर कौसडीकर, बायोमिक्स संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ. चंद्रशेखर अंबाडकर तसेच संशोधन सहाय्यक कपिल निर्वळ यांची प्रमुख उपस्थिती होती.

याप्रसंगी संशोधन संचालक डॉ. खिजर बेग, शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे यांनी बायोमिक्स संशोधन केंद्राच्या कार्याचे कौतुक करत संशोधकांचे अभिनंदन केले. बायोमिक्सला मिळालेल्या या आंतरराष्ट्रीय मागणीचे शेतकरी, कृषि तज्ज्ञ आणि कृषि क्षेत्रातील विविध घटकांकडून स्वागत करण्यात येत असून, आगामी काळात देशांतर्गत तसेच जागतिक बाजारपेठेत या उत्पादनाची मागणी आणखी वाढेल, असा आशावाद व्यक्त केला जात आहे.

यावेळी बोलताना कुलगुरू प्रा. (डॉ.) इंद्र मणी यांनी सांगितले की, बायोमिक्स हे जैविक उत्पादन शाश्वत शेतीसाठी अत्यंत उपयुक्त ठरत असून जमिनीची सुपीकता वाढविणे, पिकांची वाढ सक्षम करणे आणि रासायनिक खतांवरील अवलंबित्व कमी करणे यामध्ये त्याची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. त्यामुळे जैविक शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी हे उत्पादन प्रभावी माध्यम ठरत आहे. जागतिक स्तरावरील अग्रगण्य कृषि संशोधन संस्थांपैकी एक असलेल्या ‘आयसीआरआयएसएटी’ कडून प्राप्त झालेली ही मागणी बायोमिक्सच्या गुणवत्ता, परिणामकारकता आणि उपयुक्ततेची आंतरराष्ट्रीय स्तरावरील अधिकृत पावती असल्याचे त्यांनी नमूद केले. या माध्यमातून बायोमिक्सला जागतिक बाजारपेठेत नवी ओळख मिळणार असून देशातील शेतकर्यांनाही आधुनिक व पर्यावरणपूरक तंत्रज्ञानाचा लाभ होणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande