
लातूर, 01 जुलै, (हिं.स.)। पंचायत समितीचे सभापती सुरज बाबासाहेब पाटील यांनी तालुक्यातील हाडोळती येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आणि प्राथमिक आरोग्य केंद्राला अचानक भेट देऊन कामकाजाचा आढावा घेतला. या धडक पाहणीमुळे संबंधित विभागांत खळबळ उडाली असून, प्रशासकीय कामकाजात शिस्त येईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
सभापती पाटील यांनी हाडोळती येथील जिल्हा परिषद शाळेला अचानक भेट देऊन उपस्थितीची पाहणी केली. यावेळी त्यांनी मुख्याध्यापक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधून शाळेतील समस्या व अडचणी जाणून घेतल्या. शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तत्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या.
शाळेनंतर सभापतींनी प्राथमिक आरोग्य केंद्राची पाहणी केली. आरोग्य केंद्रामधील औषधसाठा, स्वच्छतेचा दर्जा आणि रुग्णांना दिल्या जाणाऱ्या सोयीसुविधांची त्यांनी बारकाईने तपासणी केली. यावेळी त्यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांना सक्त सूचना देत, रुग्णांना मिळणारी औषधे दर्जेदारच असावीत आणि औषधांची एक्सपायरी डेट तपासूनच ती रुग्णांना दिली जावीत, असे बजावले. तसेच, आरोग्य केंद्राच्या विकासासाठी आवश्यक असलेला निधी मंजूर करून देण्यासाठी प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे पाठवण्याचे निर्देश दिले, त्यास भरघोस निधी मिळवून देण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.
मला काही पालकांकडून विविध शाळांबाबत तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्या तक्रारींच्या अनुषंगाने आज हाडोळती येथील जिल्हा परिषद शाळा आणि प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली. पाहणीत आढळलेल्या त्रुटी आणि कमतरता दूर करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.
— सुरज पाटील, सभापती, पंचायत समिती, अहमदपूर.
सभापतींच्या या अचानक भेटीमुळे शिक्षण आणि आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांची चांगलीच धांदल उडाली. यापुढेही तालुक्यातील अशाच प्रकारच्या सार्वजनिक संस्थांच्या कामाचा आढावा घेऊन जनतेला दर्जेदार सुविधा मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis