राज्यात ११ कोटी वृक्षलागवडीचे लक्ष्य; तंत्रज्ञान व पीपीपी मॉडेलवर भर – मुख्यमंत्री
छत्रपती संभाजीनगर, 01 जुलै (हिं.स.) : राज्यातील वृक्षलागवड मोहिमेला अधिक प्रभावी आणि शाश्वत स्वरूप देण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान, खासगी–सार्वजनिक भागीदारी (पीपीपी) आणि ग्रामपंचायतींच्या सक्रिय सहभागावर भर देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फड
राज्यात ११ कोटी वृक्षलागवडीचे लक्ष्य; तंत्रज्ञान व पीपीपी मॉडेलवर भर – मुख्यमंत्री


छत्रपती संभाजीनगर, 01 जुलै (हिं.स.) : राज्यातील वृक्षलागवड मोहिमेला अधिक प्रभावी आणि शाश्वत स्वरूप देण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान, खासगी–सार्वजनिक भागीदारी (पीपीपी) आणि ग्रामपंचायतींच्या सक्रिय सहभागावर भर देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. यंदा राज्यात ११ कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले असून सर्व यंत्रणांच्या समन्वयातून हे लक्ष्य पूर्ण करण्याचे आवाहन त्यांनी केले.

मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली हरित महाराष्ट्र आयोगाच्या वृक्षारोपण मोहिमेचा आढावा घेण्यात आला. या बैठकीस वनमंत्री गणेश नाईक, ‘मित्रा’चे सीईओ तथा मुख्यमंत्र्यांचे मुख्य आर्थिक सल्लागार प्रविण परदेशी, वन विभागाचे अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, कृषी सचिव परिमल सिंह, कृषी आयुक्त सूरज मांढरे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. सर्व जिल्हाधिकारी आणि वन अधिकारी दूरदृष्यप्रणालीद्वारे सहभागी झाले.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, ग्रामपंचायतींनी उपलब्ध जमिनीचा नियोजनबद्ध वापर करून ग्रामसभेच्या ठरावाद्वारे वृक्षलागवडीचे आराखडे तयार करावेत आणि ते केंद्र सरकारच्या पोर्टलवर अपलोड करावेत. यामुळे केंद्राकडून निधी मिळण्याची शक्यता वाढेल. तसेच प्रत्येक जिल्ह्यातील अधिकाऱ्यांनी समन्वय साधून उद्दिष्टपूर्तीसाठी सातत्याने आढावा घ्यावा, असेही त्यांनी स्पष्ट केले.

राज्यात जीआयए आधारित ‘लँड बँक’ तयार करण्यात आली असून त्याद्वारे लागवडीसाठी योग्य जमीन निश्चित करण्यात येत आहे. तसेच उपग्रह तंत्रज्ञान, ड्रोन आणि जीआयएस प्रणालीच्या मदतीने वृक्षारोपणाचे रिअल-टाईम मॉनिटरिंग केले जाणार आहे. लागवड केलेल्या झाडांच्या वाढीचे सहा महिन्यांपर्यंत निरीक्षण करता येईल, अशी यंत्रणा विकसित करण्यात आली आहे.

वन विभागाकडे सध्या सुमारे ६ कोटी रोपे उपलब्ध असून पुढील वर्षापर्यंत ही क्षमता १० कोटींपर्यंत वाढवण्याचे नियोजन आहे. कृषी विद्यापीठे व खासगी रोपवाटिकांच्या सहभागातून रोप उत्पादन वाढवले जाणार असून एकूण २ कोटींहून अधिक रोपांची निर्मिती विविध संस्थांमार्फत सुरू आहे.

पीपीपी मॉडेलच्या माध्यमातून खासगी संस्थांचा सहभाग वाढवून वृक्षलागवड मोहिमेला गती देण्यावरही सरकारचा भर आहे. या संयुक्त प्रयत्नांतून राज्यात मोठ्या प्रमाणात हरित क्षेत्र वाढविण्याचे उद्दिष्ट असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

---------------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande