नवनिर्वाचित उपसभापतीपदी सचिन अहिर यांचे अभिनंदन - डॉ. नीलम गोऱ्हे
* मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या सहकार्यामुळे सात वर्षांचा कार्यकाळ यशस्वी मुंबई, 01 जुलै (हिं.स.) - महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापतीपदी आमदार सचिन अहिर यांची एकमताने निवड झाल्यानंतर शिवसेना नेत्या व माजी उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सभागृ
नीलम गोऱ्हे


* मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या सहकार्यामुळे सात वर्षांचा कार्यकाळ यशस्वी

मुंबई, 01 जुलै (हिं.स.) - महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापतीपदी आमदार सचिन अहिर यांची एकमताने निवड झाल्यानंतर शिवसेना नेत्या व माजी उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सभागृहात मनोगत व्यक्त करत त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले. अहिर यांचा दीर्घ संसदीय अनुभव, मंत्री म्हणून केलेले काम, संघटनात्मक नेतृत्व आणि सर्व पक्षांशी जपलेले सौहार्द यामुळे ते उपसभापतीपदाची जबाबदारी समर्थपणे पार पाडतील, असा विश्वास डॉ. गोऱ्हे यांनी व्यक्त केला.

डॉ. गोऱ्हे यांनी सचिन अहिर यांच्या राजकीय प्रवासाचा उल्लेख करताना ते राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष, सातत्याने निवडून आलेले आमदार व मंत्री म्हणून देखील कार्य केले असल्याची आठवण करून दिली. सभागृहातील चर्चांमध्ये अभ्यासपूर्ण उत्तरे देणे, विरोधकांचेही म्हणणे संयमाने ऐकून घेणे आणि सर्व सदस्यांना समान सन्मानाने वागविणे, ही त्यांची कार्यशैली असल्याचे डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले.

शिवसेनेत प्रवेशानंतरही पुण्याचे संपर्कप्रमुख म्हणून सचिन अहिर यांनी पक्षसंघटना मजबूत करण्यासाठी सातत्याने काम केले. कामगारांच्या प्रश्नांवर त्यांनी प्रभावीपणे भूमिका मांडली असून संघटनात्मक जबाबदाऱ्याही यशस्वीरीत्या पार पाडल्या, असे गौरवोद्गार डॉ. गोऱ्हे यांनी काढले.

उपसभापतीपदाच्या गौरवशाली परंपरेचाही त्यांनी आवर्जून उल्लेख केला. रामचंद्र गणेश सोमण, व्ही जी लिमये, श्रीमती जे टी सिपहिमलानी, रा सु गवई, वसंतराव डावखरे आदी मान्यवरांनी या पदाची प्रतिष्ठा वाढविल्याचे सांगत, त्या परंपरेला सचिन अहिर न्याय देतील, असा विश्वास डॉ. गोऱ्हे यांनी व्यक्त केला.

आपल्या सात वर्षांच्या उपसभापतीपदाच्या कार्यकाळाचा आढावा घेताना डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सांगितले की, २०१९ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांच्यावर उपसभापतीपदाची जबाबदारी सोपवली. त्यानंतर २०२६ पर्यंत शिवसेना मुख्य नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्यावर विश्वास ठेवत ही जबाबदारी कायम ठेवली. या काळात कोविड-१९ महामारीसारख्या अभूतपूर्व परिस्थितीत सभागृहाचे कामकाज सुरळीत चालविणे, महत्त्वाच्या विधेयकांवरील चर्चा हाताळणे तसेच तब्बल दीड वर्षे सभापती आणि उपसभापती या दोन्ही जबाबदाऱ्या एकाचवेळी सांभाळण्याची संधी मिळाल्याचे त्यांनी नमूद केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande