
नाशिक, 01 जुलै (हिं.स.): नाशिक ग्रामीण भागातील सारूळ, राजूर बहुला आणि विल्होळी परिसरातील खाणपट्ट्यांच्या संदर्भात शासनाने घालून दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे उल्लंघन करणाऱ्या ४७ स्टोन क्रशरवर महसूल विभागाने धडक कारवाई केली आहे. या क्रशरचा विद्युत पुरवठा वीज वितरण महामंडळाच्या (महावितरण) मदतीने त्वरित खंडित करण्यात आला आहे.
शासनाने ठरवून दिलेल्या अधिकृत मार्गदर्शक सूचना आणि पर्यावरण संहितेच्या नियमांचे पालन करणे क्रशर धारकांना बंधनकारक आहे. परतुं, तहसील कार्यालय आणि महसूल पथकाने केलेल्या प्रत्यक्ष तपासणीत ४७ क्रशर धारकांनी शासनाच्या व प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या निकषांचे सर्रास उल्लंघन केल्याचे आढळले. यामध्ये अनधिकृत उत्खनन, प्रदूषण नियंत्रण यंत्रणा न बसवणे आणि अशा त्रुटी असतानाही क्रशर चालू ठेवणे, अशा गंभीर बाबी समोर आल्या आहेत. या अनधिकृत आणि नियमबाह्य क्रशरमुळे पर्यावरणाची मोठी हानी होत असून, शासकीय महसुलाचेही मोठे नुकसान होत होते. त्याचबरोबर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आणि शासकिय नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी महसूल विभागाने हे पाऊल उचलले असून, संबंधित ४७ स्टोन क्रशरचा विद्युत पुरवठा त्वरित प्रभावाने खंडित करण्यात आला आहे. ही धडक कारवाई सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी अर्पिता ठुबे आणि तहसीलदार पंकजकुमार पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
यावेळी महसूल पथकातील मंडळ अधिकारी महिरावणी सत्यजित गोसावी, ग्राम महसूल अधिकारी अरुण फसाळे, कैलास अहिरे, सुधीर कदम, गणेश कोळी, अरुण मोरे, चंपालाल चव्हाण तसेच महावितरणचे सहाय्यक अभियंता एन. आर. भोर, के. एस. जायभावे, कनिष्ठ अभियंता व्ही. जी. सूर्यवंशी आणि वरिष्ठ तंत्रज्ञ वाय. बी. ढमाले, एस. जी. शेख, ए. आर. चौधरी, मंगेश दवंगे, कमलेश पाटील उपस्थित होते.
नाशिकचे तहसीलदार पंकज पवार म्हणाले की, नाशिक तालुक्यात कुठेही अनधिकृत अथवा पर्यावरण संहितेच्या नियमांचे पालन न करण्याऱ्या स्टोन क्रशर ची माहिती थेट तहसील कार्यालयास किवा त्या गावातील ग्राम महसूल अधिकारी आणि मंडळ अधिकारी यांना कळवावी. शासनाने घालून दिलेल्या अटीचे उल्लघन केल्यास कार्यवाही केली जाईल.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV