
मुंबई, 01 जुलै (हिं.स.) : राज्य विधान परिषदेच्या उपसभापतीपदी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सचिन अहिर यांची बिनविरोध निवड झाल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधान परिषदेत त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करत गौरवोद्गार काढले. ज्येष्ठ, अभ्यासू, अष्टपैलू आणि अनुभवी 'मास्टर ब्लास्टर' सचिन अहिर यांची सर्वोच्च सभागृहाच्या उपसभापतीपदी झालेली बिनविरोध निवड ही सभागृहासाठी अभिमानाची बाब आहे, असे सांगत त्यांनी विरोधी पक्षाचेही अर्ज मागे घेऊन सभागृहाच्या परंपरा जपल्याबद्दल आभार मानले.
शिंदे म्हणाले की, प्रत्येक व्यक्तीची काम करण्याची पद्धत वेगळी असते आणि प्रत्येकामध्ये काही ना काही विशेष गुण असतात. आमच्या संघात आता आणखी एक ऑलराऊंडर आला आहे. गोलंदाज कोणताही असो, चेंडू कितीही वेगवान असो, सचिन अहिर हे षटकार मारल्याशिवाय थांबत नाहीत. जसे क्रिकेटमध्ये सचिन तेंडुलकर दिग्गज आहेत, तसेच राजकारण आणि समाजकारणात सचिन अहिर हेही आपल्या क्षेत्रातील दिग्गज आहेत. एक सचिन क्रिकेटमधून निवृत्त झाला, तर दुसऱ्या सचिनने जबाबदारीचे पॅड बांधून नव्या डावाला सुरुवात केली आहे, असे म्हणत त्यांनी त्यांचे कौतुक केले.
उपमुख्यमंत्री म्हणाले की, २०१९ मध्ये शिवसेनेच्या उमेदवार म्हणून सचिन अहिर यांना आम्ही मतदान केले होते. आजही ते शिवसैनिक आहेत आणि उद्याही शिवसैनिकच राहतील. नीलम गोरे यांच्यानंतर पुन्हा एक शिवसैनिक या महत्त्वाच्या घटनात्मक पदावर विराजमान होत असल्याचा आनंद आणि अभिमान असल्याचे त्यांनी नमूद केले.
नीलम गोरे यांनी उपसभापती म्हणून केलेल्या उल्लेखनीय कार्याचेही त्यांनी स्मरण केले. महिलांच्या प्रश्नांवर त्यांनी प्रभावीपणे आवाज उठवला, अन्यायग्रस्तांपर्यंत पोहोचल्या आणि उपसभापतीपदाला वेगळी ओळख मिळवून दिली. विधान परिषदेची समृद्ध परंपरा सांगताना व्ही. एस. पागे, जयंतराव टिळक, शिवाजीराव देशमुख, रा. सु. गवई, फरांदे, डावखरे आणि नीलम गोरे यांसारख्या दिग्गजांनी या पदाची उंची वाढवली असल्याचे त्यांनी सांगितले. सचिन अहिरही ही परंपरा पुढे नेत सभागृहाचे पावित्र्य आणि डेकोरम कायम राखतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी